मुंबई :बीडमधील नागरिकांचा प्रशासन आणि सरकारवर विश्वास उरला नाही. त्यामुळे बीडमधील परिस्थिती चिघळली आहे. सध्या बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी परिस्थिती आहे. त्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्यासह बीडमध्ये जावं, असा टोला उबाठा खासदार संजय राऊत यांनी लगावला. आज दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची 100वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं. आम्ही भाजपासोबत नसलो, तरी अटलजींचं स्मरण करतो, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी परिस्थिती, संजय राऊतांचा आरोप :बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. या हत्या प्रकरणावरुन विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी आज सरकारवर टीका केली. "बीडमधली परिस्थिती प्रचंड चिघळली आहे. बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह बीडमध्ये जावं," असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.