मुंबई Sanjay Raut On Devendra Fadnavis : काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती ठिक नव्हती. भाजपाची हुकूमशाही मोडून काढण्यासाठी त्यांनी मविआकडून नांदेडमध्ये लोकसभा निवडणूक लढवली. त्यात जनतेनं त्यांना पाठिंबा दिला. एवढ्या लवकर सोडून जातील, असं वाटलं नव्हतं. त्यांच्या कुंटुबाच्या दुखा:त आम्ही सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनावर दिली. तसेच भाजपाला काही काम नाही, भाजपा हा भ्रमिष्ट पक्ष आहे. अत्याचाराच्या घटनेवर भाजपा बनावट प्रश्न निर्माण करत आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
नैतिकतेच्या ढोंगी गप्पा : यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "या सरकारच्या काळात महिलांवरील आणि अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ झाली आहे. बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांमध्ये 27 ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यांना याबाबत प्रश्न विचारले की, मग ते बनावट प्रश्न निर्माण करतात. भाजपाचे कार्यकर्ते पगारी नोकरदार आहेत. त्यांचे आयटी सेल, झेंडे फडकवणारे ही सगळी लोकं त्यांचे पगारी नोकरदार आहेत. मग ते महाविकास आघाडी संदर्भात पूर्णपणे बनावट आणि खोटी भूमिका घेतात. यांच्या सरकारमध्ये किमान दोन मंत्री असे आहेत, ज्यांच्यावर थेट अत्याचाराचे आरोप आहेत. त्याबाबत मविआ सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्या संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेतला होता. ते मंत्री आज भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये बसले आहेत. देवेंद्र फडणवीसांना त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हाकलपट्टी करावी. उगाच नैतिकतेच्या ढोंगी गप्पा मारु नका, असा निशाणा संजय राऊतांनी भाजपावर साधला.
ठाकरे कुटुंबावरील टीकेवरुन राऊतांची सारवासारव :विरोधकांकडून ठाकरे कुंटुबाला लक्ष्य केलं जात आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रात ठाकरे कुटुंब सर्वात लोकप्रिय कुटुंब आहे. लोकांची श्रद्धा त्यांच्यावर आहे, लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे. ठाकरे कुटुंबाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची भूमिका घेणं म्हणजे तळपत्या सूर्यावर थुंकण्यासारखं आहे, असं संजय राऊत म्हणाले. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगावात महिलांना न्याय देण्यासंदर्भात भाषण ठोकून गेले. पण तुमच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रात जे मंत्री बसलेले आहेत, त्यांच्या संदर्भात न्याय करा. संजय राठोड या मंत्र्यामुळं एका महिलेनं आत्महत्या केली आहे. विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, संजय राठोड यांच्या विरोधात सर्व पुरावे आहेत. मग ते पुरावे गेले कुठे? असा सवाल संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला.