मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आल्यानंतर आमदारांची मोठी फौज नाराज असल्याचं स्पष्ट झालं. महायुतीतील नाराजांवर आता उबाठा खासदार संजय राऊत यांनी निशाना साधला आहे. महायुतीनं छगन भुजबळांचा पुरेपूर वापर करुन घेतला आहे. आता त्यांनी कितीही आदळआपट केली, तरी हाती खुळखुळाच येणार, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली. संजय कुठे, सुधीर मुनगंटीवार, विजय शिवतारे काही दिवस रडतील, त्यांच्या हाती खुळखुळा दिला जाईल, असंही राऊत म्हणाले.
छगन भुजबळांनी किती आदळ आपट केली, तरी ...? :भुजबळांचा पुरेपुर वापर करण्यात आला. त्यामुळे छगन भुजबळांनी मनोज जरांगेविरोधात टोकाची भूमिका घेतली. मनोज जरांगेबाबत भुजबळांनी संयम बाळगायला हवा होता. छगन भुजबळ यांनी कितीही आदळआपट केली, तरी त्यांची शारीरिक आणि मानसिक ताकद किती आहे. भाजपाकडं त्यांचं बहुमत आहे. संजय कुटे, सुधीर मुनंगटीवार, विजय शिवतारे, काही दिवस रडतील, त्यांच्या हातात खुळखुळा दिला जाईल. त्यानंतर गप्प बसतील. अश्रु ढाळत आहेत, त्यांना कोण विचारत आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला.
छगन भुजबळांचा बळी गेला :शिवसेना पक्षात बंड करण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत हातमिळवणी केली. त्यानंतर पुन्हा सत्ता आल्यानंतर शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी यांनी मिळून सरकार स्थापन केलं. यावर बोलताना संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. "देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात घेतलेल्या नमुन्यांचा अभ्यास करावा. छगन भुजबळांचा वापर करून त्यांना वाऱ्यावर सोडलं. एकनाथ शिंदेंच्या मागे असलेली महाशक्ती ही छगन भुजबळांच्या मागे होती. त्यात छगन भुजबळांचा बळी गेला," अशी टीका त्यांनी यावेळी केली.
एक देश एक निवडणूक संविधानाच्या विरोधात :आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वन नेशन वन इलेक्शन विधेयक मांडण्यात येणार आहे. मात्र वन नेशन वन इलेक्शन या विधेयकाला काँग्रेसह त्यांच्या मित्रपक्षांचा विरोध आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, की एक देश एक निवडणूक, हे संविधानाच्या विरोधात आहे. ज्या गोष्टी संविधानाला मान्य नाहीत, त्या गोष्टी लादण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई महानगरपालिकेसह इतर महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या आहेत. निवडणूक आयोग संपवायचा आहे. सर्व संस्था ताब्यात घ्यायच्या आहेत, असं संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. मात्र याबाबत जम्मू काश्मीरचे नेते ओमर अब्दुल्ला आणि अभिषेक बॅनर्जी यांची मतं वेगळी असल्याचं त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी "ओमर अब्दुल्ला आणि अभिषेक बॅनर्जी त्यांचं मत वैयक्तिक, असल्याचा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा :
- बांगलादेशात मंदिरांसह हिंदूंवर हल्ले ; पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाहांना हिंदू केवळ मतांसाठी हवाय, संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा
- 'भाजपा अन् मोदी-शाह यांच्या स्वार्थामुळेच जगभरातील हिंदू संकटात;' खासदार संजय राऊतांची टीका
- दिल्लीनं डोळे वटारले की एकनाथ शिंदेंना गप्प बसावं लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले 'महायुतीनं स्वाभिमानाच्या गप्पा करू नयेत'