पुणे Sanjay Raut On Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान आज मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे, असं सचिन वाजे यांनी सांगितलं. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी याप्रकरणावरून भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत, "भाजपा निवडणुका जिंकण्यासाठी संत महात्मांचा आधार घेत आहे," असं वक्तव्य केलंय.
सचिन वाजे भाजपाचा प्रवक्ता : पुण्यात संजय राऊत यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते म्हणाले, "भाजपा पराभवाच्या भीतीने विरोधकांवर हल्ला करण्यासाठी अशा संत महात्म्यांचा वापर करत असेल तर निवडणूक न लढताच त्यांनी पराभव मान्य केला आहे. अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलेत त्यावर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं, पण यावर उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातील प्रवक्ता लागतोय. खून, दहशतवाद यातील एक आरोपी हा भाजपाचा प्रवक्ता म्हणून काम करत आहे. हे असं देशात प्रथमच पाहायला मिळत आहे."
अँटिलिया प्रकरणातील दोन आरोपी 'मिंधे' गटात :ते पुढे म्हणाले, "ज्या अँटिलिया प्रकरणात बॉम्ब ठेवले गेले त्यात एका निरपराध व्यक्तीचा खून केला गेला. यातील दोन मुख्य आरोपी हे पोलीस खात्यातील आहेत. मुंबईच्या पोलीस आयुक्तांना क्लीन चिट देण्यात आली आणि जे दोन आरोपी होते ते सुटले असून ते 'मिंधे' गटात आहेत. ते त्यांच्यासाठी काम करत आहेत. कदाचित एक जण अंधेरी येथून निवडणूक देखील लढू शकतो. दुसरे महात्मा आहे ते अशा पद्धतीनं पत्र व्यवहार करून भाजपाचा प्रवक्ता म्हणून जेल मध्ये काम करत आहेत. राजकारणासाठी तसंच निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा गुंडांचा वापर करत असल्याचं यावेळी संजय राऊत म्हणाले."