महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपानं आयात केलेले भ्रष्ट नेते लोकसभा निवडणुकीत मोदींची वाट लावणार, संजय राऊतांची जहरी टीका - Lok Sabha Election 2024

Sanjay Raut : महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीय. याबाबतीत लवकरच तोडगा काढला जाईल, असं शिवसेना प्रवक्ता खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 2:32 PM IST

Sanjay Raut
संजय राऊत

मुंबईSanjay Raut : "बुधवारी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. मात्र, चार जागांबाबत अजूनही तोडगा निघालेला नाही. भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवेल, असं मला वाटतंय. आम्ही आघाडी धर्म पाळला आहे. आम्ही आघाडी धर्म पाळताना स्वाभिमान कायम ठेवलाय. कुठंही तडजोड केलेली नाही,'' असा दावा संजय राऊत यांनी केला. तसंच सांगलीचा उमेदवार बदलण्यात येणार नाही. सांगलीच्या जागेवर आपला दावा कायम असून आपण उद्या सांगलीला जाणार असून तिथे महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना भेटणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. आज ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजपा सरकार तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील प्रहार केला.

भ्रष्ट लोकच त्यांचे बारा वाजतील :2014 पासून देशभरातील प्रमुख 25 नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांची यादी समोर आलेली आहे. ज्या 25 नेत्यांवर भ्रष्टाचाराचे भाजपानं आरोप केले, तेच नेते आज भाजपामध्ये आहेत. यांच्याविरोधात मोदींनी देशभरामध्ये वातावरण निर्माण केलं. 25 भ्रट नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील 12 नेते आहेत. ते सर्व 12 जण भाजपासह मोदींचे बारा वाजतील, असा टोला यावेळी संजय राऊतांनी लगावला. मोदी सतत म्हणायचे मी खाणार नाही आणि खाऊ देणार नाही. भ्रष्ट लोकांना पाठीशी घालणार नाही. परंतु आता तेच 25 भ्रष्ट नेते भाजपासोबत आहेत, यावर भाजपा आणि मोदी शांत का बसलेत?, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपासह मोदींवर केली. भाजपानं देशातील भ्रष्टाचारी लोकांना स्वतःच्या वॉशिंग मशिनमध्ये घालून स्वच्छ धुऊन घेतलं. यावर कोर्टानंही भाष्य केलंय. भाजपाची सत्ता ही भ्रष्टाचारी लोकांमुळे उभी आहे. यावर मोदींनी खुलासा करण्याची मागणी राऊत यांनी केली.

एकनाथ शिंदे दहशतीखाली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जागा होत्या त्या ठिकाणी शिंदे गट अजून उमेदवारी जाहीर करु शकले नाही. एकनाथ शिंदे स्वतःचा बालेकिल्ला समजणाऱ्या ठाण्यात अजून उमेदवार जाहीर करू शकले नाहीत. हिंगोली, नाशिक, यवतमाळ-वाशिम या ठिकाणी जागेवरुन त्यांना तडजोड करावी लागत आहे. भाजपा त्यांच्यावर दबाव टाकून शिंदे गटाकडून जागा घेत आहे. सध्या मुख्यमंत्री दहशतीखाली वावरत आहेत. अचानक कुठेही गायब होत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.

मस्तीचा पराभव करणार :कल्याणमध्ये लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटानं वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र इथं महायुतीचा उमेदवार जिंकून येईल, असं शिंदे गटानं म्हटलंय. यावर बोलताना राऊत म्हणाले की, यावेळी लोकांनी ठरवलं इथं पैशाची मस्ती, माज, अहंकाराचा पराभव करायचा आहे, तो आम्ही करणार. महिला शिवसैनिक वैशाली दरेकर यांना आम्ही उमेदवारी दिली आहे. त्या शंभर टक्के निवडून येतील. तुमची अजून तिथं उमेदवारी जाहीर झालेली नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास उमेदवार जाहीर झालेत. परंतु तुमचे उमेदवार अजून जाहीर झालेले नाही. तुम्ही विजयाच्या गोष्टी कशाला करताय, असा टोला राऊतांनी शिंदे गटाला लगावला. "श्रीकांत शिंदे हे बच्चे आहेत. उद्धव ठाकरेंमुळं त्यांना मागच्यावेळी खासदारकी मिळाली. पण, आता ते दिल्लीला जाणार नाहीत. 'बच्चे अब दिल्ली बहुत दूर है.' श्रीकांत शिंदे अजून बच्चा आहेत," या शब्दांत त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची खिल्ली उडवली.

जागावाटपाबाबत कुठलाही पेच नाही : महाविकास आघाडीची बुधवारी बैठक पार पडली. चार जागांचा तिढा अजूनही कायम आहे. परंतु तो चर्चेनंतर सुटेल. आज महाविकास आघाडीची पुन्हा बैठक होणार आहे. भिवंडीच्या जागेवर अजून एकमत झालेलं नाहीये. अजून तीन जागा आहेत यावर आमची चर्चा सुरू आहे. परंतु या जागांवरून महाविकास आघाडीमध्ये कोणताही पेच निर्माण झालेला नाही, असं संजय राऊत म्हणाले. सांगलीची जागेवर आमचा दावा कायम असून, चंद्राहार पाटील हेच तिथून उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील. आमची टीम लवकरच तिथे जाणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.

लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही :काल (बुधवारी) खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात जाऊन स्वतःचीच कबर खोदली आहे. लोकांचा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास नाही, अशी टीका भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी केली. त्यावर राऊत यांनी प्रश्नांची सरबत्ती करत विचारलं, "मग कुणावर विश्वास आहे? नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे का? अमित शाह यांच्यावर विश्वास आहे का? अजित पवारांवर विश्वास आहे का? कोणावर विश्वास आहे? या देशात लोकांचा गांधी कुटुंबावर विश्वास आहे. राहुल गांधी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. भ्रष्ट म्हणून बोंबलायचं आणि त्याच भ्रष्ट लोकांना मांडीवर, खांद्यावर घेऊन फिरायचं याला काय म्हणायचं?"

हे वाचलंत का :

  1. संजय निरुपम यांनी आज घोषणा करण्यापूर्वीच काँग्रेसनं दाखवला घरचा रस्ता, 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी - Sanjay Nirupam News
  2. उमेदवारी अर्ज भरायला निघालेल्या नवनीत राणांना दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द - Navneet Rana
  3. खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला महायुतीमधून विरोध, शिंदे गट उमेदवार बदलणार? - Lok Sabha election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details