मुंबईSanjay Raut:कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल (21 मार्च) अटक केल्यानंतर आज देशभर त्याचे पडसाद उमटत आहेत. शिवसेना उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी बोलताना देशभरात सुरू असलेल्या निवडणूक रोखे घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांना अटक केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण उद्धव ठाकरे गट त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मुंबईत आपल्या निवासस्थानी ते बोलत होते.
भाजपाच्या तिजोरीत हजारो कोटी :याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अगोदर मनीष सिसोदिया, संजय सिंग, हेमंत सोरेन, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के सी राव यांच्या कन्या कविता आणि आता केजरीवाल यांना ज्या पद्धतीनं तुम्ही अटक केली आहे. ते पाहता हे सर्व रशिया, चायनामध्ये जिथे हुकूमशाहीचे राज्य चालू आहे तसंच सुरू असल्याचं दिसतं. अरविंद केजरीवाल यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी फार मोठा संघर्ष केला आहे. जर घोटाळ्याचा विषय असेल तर तुम्ही तपासून बघा. निवडणूक रोखे याच्या माध्यमातून भाजपाच्या तिजोरीत हजारो कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामधील किती लोकांवर सीबीआय, ईडीची कारवाई सुरू आहे? किती लोकांच्या खात्यामध्ये करोड रुपये गेले आहेत? मद्य घोटाळ्याचे जे ठेकेदार आहेत त्यांनीच सर्वांत जास्त पैसे निवडणूक रोख्याच्या माध्यमातून भाजपाच्या तिजोरीत जमा केले आहेत. ही लोकशाही नाही तर तानाशाही आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
आम्ही कमकुवत नाही तर मजबूत झालो :संजय राऊत पुढे म्हणाले की, केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम्ही कमकुवत झालो नाही तर उलट हे कृत्य करून भाजपा विरोधात लढण्यासाठी आम्हाला मोदींनी जास्त प्रेरणा दिली आहे. आम्ही सर्वजण केजरीवाल यांच्यासोबत मजबुतीने उभे आहोत. या संघर्षामध्ये त्यांच्यासोबत लढू. या लढ्यात उद्धव ठाकरे आणि पूर्ण शिवसेना त्यांच्या परिवारासोबत राहील.
भ्रष्टाचारापासून भाजपा वाचणार नाही :निवडणूक रोख्याचा जो भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयामुळे समोर आलेला आहे आणि संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं या भ्रष्टाचाराची गोष्ट पसरली आहे, ती दाबण्यासाठी व निवडणूक रोखे विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवाल यांना अटक केली गेली आहे; परंतु या भ्रष्टाचारापासून आता भाजपा वाचणार नाही. एकेकाळी नरेंद्र मोदीसुद्धा भ्रष्टाचाराविरुद्ध केजरीवाल यांच्यासोबत लढा देत होते. केजरीवाल यांना केलेली अटक ही पूर्णपणे घटनाबाह्य आणि राजकीय सूडबुद्धीनं केलेली आहे. निवडणूक रोखे घोटाळा भाजपावर शेकलेला आहे. गुन्हेगारांकडून, दहशतवाद्यांकडून भाजपाने पैसे जमा केले आहेत. तसंच गोवंश बंदी प्रकरणात तुम्ही काय केलं? ज्यांनी गाईचं मांस विकलं त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही पैसे घेतले, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
अण्णा हजारे कुठे आहेत :संजय राऊत पुढे म्हणाले की, मोदी आणि अमित शाह यांना ज्यांच्याकडून भीती वाटते त्या सर्वांना ते अटक करू शकतात. लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, लाल-बाल-पाल या सर्वांची ब्रिटिशांना भीती होती म्हणून त्यांनी त्यांना तुरुंगात टाकलं. त्या पद्धतीनं मोदीचं सरकार काम करत आहे त्यांना निवडणूक हरण्याची भीती वाटत आहे. म्हणून हे सर्व सुरू आहे. अण्णा हजारे आता कुठे असतात ते मला माहीत नाही. एकेकाळी या सर्वांविरुद्ध त्यांचं आंदोलन असायचं. आता ते कुठे हरवले मला माहीत नाही; पण त्यांना कोणीतरी जाऊन सांगा, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
हेही वाचा :
- रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीविताला धोका, सुरक्षा द्यावी- सुप्रिया सुळेंचं पोलीस अधिक्षकांना पत्र - Supriya Sule writes letter to SP
- देशाच्या इतिहासात प्रथमच, मुख्यमंत्री केजरीवालांच्या अटकेनंतर तुरुंगातून चालणार दिल्ली सरकारचा कारभार - ED arrested CM Kejriwal
- केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करणाऱ्या आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पोलिसांनी मारहाण केल्याचा प्रीती मेनन यांचा दावा - Mumbai AAP protest