मुंबई Sanjay Raut Attack On Pm Modi : निवडणूक आयोग ही भाजपाची शाखा आहे. दिल्लीमधील निवडणूक आयोगाचं नाव बदलून भाजपा निवडणूक आयोग करणं गरजेचं आहे, असा हल्लाबोल उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत केला. "महाराष्ट्रामध्ये जय भवानी हा शब्द किंवा हर हर महादेव या घोषणा पिढ्यानपिढ्या दिल्या जात आहेत. आतापर्यंत कोणी बंदी आणली नव्हती. तुमचं घर घर मोदी चालतंय पण हर हर महादेव आणि जय भवानी चालत नाही. तुमचं नमो नमो चालतंय पण जय भवानी चालत नाही. तुमचं सरकार नकली हिंदुत्ववादी आहे,"अशी टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली.
तुमचं व्यापारी आणि नकली हिंदुत्व :"देवेंद्र फडणवीस म्हणतात, तुम्हाला हिंदुत्वाचं नाव घेण्याचा अधिकार नाही, मग तुम्हाला आहे? तुम्ही काय दिवे लावले हिंदुत्वाचे. शिवसेनेचा हिंदुत्वाशी जो संबंध आहे, त्याच्या आसपासही भाजपा टिकू शकत नाही. तुमचं व्यापारी आणि नकली हिंदुत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत असलेल्या जय भवानी मातेवर निवडणूक आयोग बंदी आणतंय आणि तुम्ही हात चोळत बसले आहात," असा घणाघात राऊत यांनी सत्ताधारी महायुतीवर केला आहे.
अरविंद केजरीवाल यांची हत्या करायची का ? :तुरुंगात अरविंद केजरीवाल यांना औषधं देण्यावर अडचण निर्माण झाली आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, "तुरुंगात मला देखील माझी औषधं मिळत नव्हती. अरविंद केजरीवाल यांना मधुमेहाचा आजार आहे, थोडी तरी माणुसकी असली पाहिजे. अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री आहेत. पूर्ण बहुमत त्यांच्याकडं आहे, त्यांना त्यांची औषधं न देणं म्हणजे तुम्हाला त्यांची हत्या करायची आहे का?" असा थेट सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. "हा माझा देखील अनुभव आहे, मला देखील औषध दिली जात नव्हती. त्यासाठी मला भांडावं लागत होतं. जर आमच्या सारख्या लोकांना तुरुंगात औषध दिली जात नसतील, तर सामान्य कैद्यांची काय परिस्थिती असेल. केजरीवाल यांच्यासोबत जे कोणी तुरुंगात आहेत, ते कैदी नाहीत तर तुमच्या बदल्याच्या भावनेनं त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे," असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं सरकार खूप खतरनाक आणि सैतानी आहे," असा आरोप संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा :
- पंतप्रधान पदावरुन संजय राऊत नाना पटोलेंमध्ये जुंपली; राऊत म्हणाले 'उद्धव ठाकरे होऊ शकतात पंतप्रधान पदाचे उमेदवार' - Sanjay Raut Slams Nana Patole
- संजय राऊतांना मानसिक उपचाराची गरज; आरोपांनंतर श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल - Shrikant Shinde On Sanjay Raut