सातारा : विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly Election Result) जाहीर होऊन आठ दिवस झाले तरी नवीन सरकार स्थापन झालेलं नाही. अमावस्येमुळं सरकार स्थापनेचा मुहूर्त पुढे ढकलला असल्याची चर्चा सुरू आहे. 'पुरोगामी महाराष्ट्राला हे भूषणावह नाही', अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे समन्वयक डॉ. हमीद दाभोळकर यांनी दिली आहे.
शिवसेनेची (उबाठा) मुख्यमंत्र्यांवर टीका : सत्ता स्थापनेचा तिढा असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी आल्यानं शिवसेनेच्या (उबाठा) नेत्यांनी खोचक टीका केली आहे. राजभवानात जाण्याऐवजी हे लोक शेतात पुजाअर्चा करण्यासाठी का जातात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. गावी जाण्यासाठी मुख्यमंत्री अमावस्येचाच मुहूर्त का काढतात, अशी कोणती देवी आहे, असा खोचक सवाल खासदार संजय राऊत यांनी केला. तर आदित्य ठाकरे यांनी आकाशाकडे पाहत 'चंद्र दिसतोय का'? असं विचारलं.
सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची चर्चा : मागील सव्वा दोन वर्षात एकनाथ शिंदे दरे गावी गेल्यानंतर शिवसेनेकडून (उबाठा) त्यांच्यावर टीका केली जायची. सध्या सत्ता स्थापनेचा तेच असताना मुख्यमंत्री तडक आपल्या गावी आल्यानं विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. तसंच सोशल मीडियावरदेखील टीकेचा सूर पाहायला मिळत आहे.
पुरोगामी महाराष्ट्राला 'हे' भूषणावह नाही : या संदर्भात प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे समन्वयक डॉ. हमीद दाभोळकर म्हणाले , "निकाल जाहीर होऊन आठ दिवस झाले तरी नवीन सरकार स्थापन झालेलं नाही. अमावस्येमुळं मुहूर्त मिळत नसल्यानं सरकार स्थापना पुढं ढकलली जात असल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरू आहे. अर्ज भरताना उमेदवार तिथी, मुहूर्त आणि ज्योतिषाचा आधार घेतात. एकीकडे पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचा आणि अशा गोष्टी करायच्या केल्याच दिसून येत आहे. हे महाराष्ट्राला भूषणावह नाही".
हेही वाचा -