मुंबई : दुरुस्ती आणि देखभालीच्या कारणास्तव मध्य रेल्वेनं मुख्य मार्गिकेसह हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर केलाय. या ब्लॉकचा परिणाम लोकल वाहतूक सेवेसह लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. तर बेलापूर/नेरुळ आणि उरण बंदर मार्गादरम्यान सेवा सुरू राहणार असल्याची माहिती रेल्वे विभागानं दिलीय. तर, दुसरीकडं पश्चिम रेल्वेनं मात्र आज कोणताही ब्लॉक जाहीर केलेला नाही.
रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेशी संबंधित तांत्रिक कामं करण्यासाठी आजचा मेगाब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिलीय. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गाच्या पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळं या मार्गांवरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना आज समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
मेगाब्लॉकचे वेळापत्रक : मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन एक्सप्रेस मार्गावरून वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शिव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढं विद्याविहार स्थानकातून अप मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानका दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.
पनवेलहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलसेवा बंद : पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान, अप हार्बर मार्गावरील पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि डाऊन हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूर या मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर, पनवेलहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्ग आणि डाऊन मार्गावरील सेवाही रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेनं दिलीय. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान ठाणे-वाशी किंवा नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल अशी माहितीही रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा -
- ऐन सणासुदीत मुंबईकरांचं टेन्शन वाढलं; तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक नक्की पाहा - Mumbai Local Mega Block
- चाकरमान्यांनो मुंबईत परत येत आहात, आधी मेगाब्लॉकचं वेळापत्रक वाचा अन्यथा होईल फजिती - Mumbai Local Mega Block
- आज 'ब्लॉकवार'; मध्य रेल्वेचा मेगा तर पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लॉक; संपूर्ण वेळापत्रक वाचा फक्त एका क्लिकवर - Mumbai Local Train Mega Block