मुंबई : उबाठा खासदार संजय राऊत यांनी संतोष देशमुख हत्याकांडावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "सरकारमधील अनेक मंत्री थेट माफियाशी संबंधित आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याची अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिंमत होत नाही," असा हल्लाबोल त्यांनी केला. यावेळी संजय राऊत यांनी खासदार फोडाफोडीवरुनही टीका केली, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सोडून जाणारे नेते हे रावणाचे वंशज असल्याची टीकाही यावेळी संजय राऊतांनी केली. दुसरीकडं शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बुथ मॅनेजमेंटचं कौतुक केलं, याबाबत संजय राऊत यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारलं. यावर "प्रत्येक बुथवर घोटाळा झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बुथ मॅनेजमेंट घोटाळ्याचं होतं, त्यामुळे मी त्याचं कौतुक करणार नाही," अशी टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली.
अमित शाहांना खूश करण्यासाठी खासदार फोडाफोडी :शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या 7 खासदारांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. बाप लेकींना सोडून राष्ट्रवादीत या, असा प्रस्ताव सुनिल तटकरे यांनी दिल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. यावरुन खासदार संजय राऊत यांनी सोडून जाणाऱ्या नेत्यांवर हल्लाबोल केला. "अमित शाहांना खूश करण्यासाठी खासदार फोडाफोडी करण्यात येत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएमच्या भरोश्यावर जिंकली. मात्र आता खासदार फोडले तरच, केंद्रात मंत्रिपद मिळेल, अशी ऑफर त्यांना अमित शाहांनी दिली, त्यामुळे खासदार फोडाफोडी करण्यात येत आहे. मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सोडून जाणारे नेते हे रावणाचे वंशज आहेत," अशी जोरदार टीका संजय राऊतांनी केली.