सातारा : अमरावतीच्या चांदूर रेल्वे शहरात सापडलेल्या शंभर रूपयांच्या बनावट नोटांच्या रॅकेटचे धागेदोरे सातारा जिल्ह्यात पोहोचले आहेत. अमरावती पोलिसांनी कराड तालुक्यातील मसूर या गावातील दोन संशयितांच्या घरावर छापेमारी केली. यावेळी पोलिसांनी शंभर रूपयांच्या 31 बनावट नोटा जप्त केल्या. नितीन चंद्रकांत जाधव आणि सूरज मारूती धस, अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावं आहेत. दोघांवर खून, खुनाच्या प्रयत्नाचे गंभीर गुन्हे नोंद आहेत.
नेमकी घटना काय? : अमरावतीमधील चांदुर रेल्वे शहरात 2 जानेवारी रोजी रात्री एलसीबी पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी आठवडी बाजारात फिरणाऱ्या अंकुश गुलाबराव सोनकुवर (रा. सांगूलवाडा, ता. चांदूर रेल्वे) या तरूणाला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलं असता त्याच्याकडं शंभर रूपयाच्या 7 बनावट नोटा आढळल्या. बनावट नोटा आणि मोबाईल जप्त करून पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांच्या तपासात बनावट नोटांच्या रॅकेटचे धागेदोरे सातारा जिल्ह्यात असल्याचं समोर आलं.
अमरावती पोलिसांचा कराड तालुक्यात छापा : बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये मसूर (ता. कराड) गावातील दोघांचा सहभाग असल्याची माहिती तपासात समोर आली. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सुयोग महापुरे यांच्या पथकानं मसूरमधील नितीन चंद्रकांत जाधव आणि सूरज मारूती धस या दोन संशयितांच्या घरावर छापे मारून शंभर रूपयांच्या 31 बनावट नोटा जप्त केल्या. त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयानं त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. गुरुवारी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
दोघांच्या अटकेनं तपासाला गती : बनावट नोटांच्या रॅकेटमधील दोघांना अटक झाल्यानं पुढील तपासाला गती आली आहे. बनावट नोटा कुठं छापल्या जात होत्या? त्या कुठं आणि कशा पद्धतीनं बाजारात खपवण्यात आल्या? याचा तपास चांदूर रेल्वे पोलीस करत आहेत. तसेच शंभर रूपयांच्या बनावट नोटा कराड तालुक्यातही खपवण्यात आल्याचा संशय पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापुरे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा :
- बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, 1 लाख 90 हजाराच्या नोटांसह 3 लाखांचा मुद्देमाल जप्त - Fake currency notes factory busted
- लोकसभा निवडणुकीनंतर नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात बनावट नोटा आढळल्याने खळबळ - Fake Currency Nandurbar
- बुलडाण्यात आढळले बनावट नोटा छापण्याचे मशीन? मलकापूर पोलिसांनी प्रिंटिंग मशिन्स केल्या जप्त