कोल्हापूर Keshavrao Bhosale Natyagruha : कोल्हापूरच्या कलाकारांचा 'आत्मा' असणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री आग लागली. त्यामुळं कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा असलेलं कलामंच आगीतच जळून खाक झाल्यानं कोल्हापुरकरांना अश्रू अनावर झाले. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची वास्तू खुद्द छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारानं बांधण्यात आली. संगीत, रंगभूमीची बीजंही याच वास्तूत रुजली. अचानक लागलेल्या आगीमुळं कोल्हापूरची ओळख आज आगीत होरपळून निघताना पाहणं दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
110 वर्षांचा इतिहास :1912 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी युरोपमधील इटलीला भेट दिली होती. या दौऱ्यात राजर्षी शाहू महाराजांना रोम शहरातील ऑलिम्पिक मैदान तसंच त्यालगत नाट्यगृह दिसलं. असंच नाट्यगृह उभारण्यासाठी शाहू महाराजांनी पुढाकार घेऊन कोल्हापुरात नाट्यगृह तसंच क्रीडांगण उभारलं. त्याचप्रमाणे करवीर नगरीच्या खासबागेत कुस्ती मैदान उभारलं. हा त्यावेळच्या पॅलेस थिएटरचा आणि आताच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा सुमारे 110 वर्षांचा इतिहास आहे. गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ याच मंचावर मराठी रंगभूमीच्या अनेक कलाकारांनी आपली कला सादर करून नाव कमावलं आहे. कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाला पाय लागले नाही, असा एकही कलाकार तंत्रज्ञ नाही. म्हणूनच आज केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यावर राज्यभरातील अनेक कलाकारांनी या ठिकाणी हजेरी लावली. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.