मुंबई Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी सहाव्या आरोपीला हरियाणा इथून अटक केली. अटक आरोपी हरपाल सिंग उर्फ हॅरी याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम आपल्या शोधात आल्याचं समजताच हरपाल सिंग यानं पगडी काढून केस कापले. जेणेकरुन आपली ओळख लपवून मुंबई पोलिसांना चकमा देता येईल. मात्र, तरी देखील मुंबई पोलिसांच्या टीमनं 9 दिवस अथक परिश्रम घेत हरपाल सिंगच्या हालचालींवर लक्ष ठेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पगडी काढून कापले केस :मुंबई पोलिसांपासून वाचवण्यासाठी हरपाल सिंग यानं पगडी काढून केस कापले. मात्र तरी पोलिसांनी त्याला 9 दिवस पाळत ठेऊन बेड्या ठोकल्या. हरपाल सिंग उर्फ हॅरी याच्या विरोधात भटिंडा इथं 2022 मध्ये कलम 399 अन्वये गुन्हा दाखल आहे. त्यानं 2023 मध्ये रायपूर इथं एका व्यावसायिकावर खंडणीसाठी गोळीबार केला. 2018 पासून पाचवा आरोपी मोहम्मद रफिक सरदार चौधरी आणि हरपाल सिंग उर्फ हॅरी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आले. राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या राज्यातील काही भाग बिष्णोई गँगनं प्रभावित असून इथं अनेक तरुणांचे लॉरेन्स बिष्णोईच्या फॅन्सचे वॉट्सअॅप ग्रुप देखील सक्रिय आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून देखील अनेक जण लॉरेन्स बिष्णोई गँगशी जोडल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.