मुंबई Salim Khan: प्रेयसीवर छाप पाडण्यासाठी चित्रपट निर्माते-पटकथा लेखक सलीम खान यांना 'लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या' अशी धमकी देऊन दुचाकीवरुन पळून गेलेल्या प्रियकर आणि तिच्या प्रेयसीला शिवडी परिसातून अटक करण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वीच बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वाहनांच्या ताफ्यात शिरकाव करणाऱ्या २१ वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आली होती. या घटनेला २४ तास उलटत नाहीच तोच सलमान खानचे वडील सलीम खान यांना दुचाकीवरुन आलेल्या या प्रेमीयुगुलाने धमकी दिली होती. या दोन्ही घटनाप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय कायदा कलम २९२ (सार्वजनिक उपद्रव), ३५३ (२) (सार्वजनिक उपद्रव) आणि ३ (५) (सामान्य हेतूने केलेले गुन्हेगारी कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी रात्री वांद्रे (पश्चिम) येथे अभिनेता सलमान खान घरी परतत असताना त्याच्या ताफ्यात घुसलेल्या उझैर मोईनुद्दीन (२१ ) या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.
उमर आसिफ शेख (वय २६) आणि त्याची मैत्रीण अश्मा शेख (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या प्रेमीयुगुलाची नावं आहेत. अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी या प्रेमीयुगुलाच्या लक्षात ठेवलेल्या चार अंकी स्कूटर क्रमांक (७४४४) पोलीस पथकाने कार्टर रोड ते शिवडीपर्यंतचे ८० सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासल्यानंतर दोघांना शिवडी परिसरातून गुरुवारी अटक करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेते सलमान खान यांचे वडील सलीम खान हे बुधवारी सकाळी ८.४५ वाजता मॉर्निंग वॉक केल्यानंतर वांद्रे (पश्चिम) येथील गॅलेक्सी अपार्टमेंट्स या निवासस्थानापासून २५० मीटर अंतरावर असलेल्या विंडरमेअर बिल्डिंगजवळ विसाव्यासाठी बसले होते. त्यावेळी एक ऍक्टीव्हा मोटारसायकलवरून बुरखाधारी महिला आणि एक पुरुष त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी 'लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या'अशी धमकी देऊन दोघेही तेथून पळून गेले.