पुणे Rupali Chakankar: देशभरात लवकरच लोकसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदार संघाकडे लागलं आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं निश्चितच झाल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत अजित पवार गटाच्या प्रवक्त्या आणि राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, "बारामतीची जनता भावी खासदार म्हणून सुनेत्राताई यांना मान्यता देत आहे. म्हणून आम्हाला खात्री आहे की, जितक्या जागा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या लढवल्या जाणार आहे त्या जागांमध्ये सुनेत्रा पवार या सर्वाधिक मतांनी निवडून येतील."
'त्या' पेपरवर सुप्रिया सुळे पास :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील सर्किट हाऊस येथे 34 गावांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर रुपाली चाकणकर यांना विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. बारामती लोकसभाबाबत यावेळी त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, "गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात काम करत आहोत. अजित पवारांनी जी कामं गेल्या पंधरा वर्षांत केली आहे त्या पेपरवर कॉपी करून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे पास झालेल्या आहेत. बारामती एक नंबर वरच आहे ती अजितदादांच्या कामांमुळं आणि प्रशासनावरील पकड असल्यामुळं."