नागपूर-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील मुख्यालयात विजयादशमी सण साजरा करण्यात येत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या कार्यक्रमात 'शस्त्रपूजा' केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पथसंचलन केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, " संघाचे शताब्दी वर्ष असल्याने हे महत्त्वाचे वर्ष आहे. अहिल्यादेवी होळकर यांचं स्मरण करतो. दयानंद स्वरस्वती यांचं 200 वे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. भारताच्या पुनरुत्थानमध्ये दयानंद सरस्वती यांचं महत्त्वाचं स्थान आहे. बलवान देश करायचा असेल तर प्रजेत चारित्र्य पाहिजे. सामाजिक आणि राष्ट्रीय चारित्र्य पाहिजे. बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांच्या शोषण विरुद्ध जनजातीयमध्ये जागृती उत्पन्न केली. हे सगळे लोक आमच्या समोर मूर्तिमंत उदाहरण आहेत. तसे आम्ही व्हायला पाहिजे. या सगळ्यात देशहिताचा समान धागा होता. त्यांनी सामाजिक हितासाठी काम केलं. स्वतःसाठी काही ठेवले नाही. समाजात अशी शक्ती उभी राहिल्यावर देशाचे उत्थान होते. देशात राजकीय चारित्र्याची आवश्यकता आहे."
पाकिस्तानसोबत हात मिळवण्याची भाषा-मोहन भागवत यांनी देशाच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते म्हणाले, "बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत आहेत. त्यांना सर्वांच्या मदतीची गरज आहे. सरकारच्या मदतीची गरज आहे. हिंदू दुर्बल राहिले तर अत्याचार होणार आहेत. ज्या बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारताचा हात आहे, त्याच बांगलादेशमध्ये पाकिस्तानसोबत हात मिळवण्याची भाषा होत आहे. भारतातही असे व्हावे, असे उद्योग सुरू आहेत. सांस्कृतिक परंपरेच्या विरोधात हे विचार जातात. संस्थांवर कब्जा करा, हे त्यांचे पाहिले पाऊल असते. त्या माध्यमातून विचारांना विकृत करतात. आपल्या लोकांविरोधात उभे करणे हे त्यांचे पहिले काम असते. विविधतचे नेरेशन देतात. इतक्या मोठ्या देशात सगळेच ठीक नसते. देशाच्या सीमावर्ती भागात अशा घटना वाढल्या आहेत."