नागपूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती आणि विशेषत: भाजपानं मिळवलेल्या यशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं योगदान आहे, असं लोक मानतात. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर भाजपा आणि संघानं अशी कोणती जादू केली, ज्यामुळं भाजपानं तब्बल 132 जागा जिंकल्या. हे समजून घेण्यासाठी आरएसएस आणि भाजपामध्ये गेल्या 5 महिन्यात काय घडलं, हे समजून घेणं इंटरेस्टिंग आहे.
"सुरुवातीला दहा वर्ष संघ परिवाराचं देवेंद्र फडणवीस यांच्यावर अजिबात नियंत्रण नव्हतं. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस हे ज्याप्रकारे भाजपाच्या नियंत्रणात काम करत होते, त्याच प्रकारे ते आरएसएसच्या नियंत्रणात काम करू लागले. त्याचा हा निकाल आहे," असं संघ अभ्यासक दिलीप देवधर यांनी सांगितलं.
लोकसभेच्या निकालानंतर संघ ॲक्टिव्ह : "पाच महिन्यांपूर्वी म्हणजे 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर 5 जूनला देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण पराभवाची जबाबदारी स्वीकारत "मी राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडतो. मला संघटनेत काम करू," द्या अशी भूमिका घेतली होती. त्यांनतर आरएसएस ॲक्टिव्ह झाला," अशी माहिती संघ अभ्यासक दिलीप देवधर यांनी दिली.
राजीनामाची घोषणा करताच आरएसएस ॲक्टिव्ह :"लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 6 जूनला आरएसएसचे सहसरकार्यवाह अतुल लिमये पदाधिकाऱ्यांसह नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले. देवेंद्र फडणवीसांशी त्यांनी तासभर चर्चा केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पदावर कायम राहतील, ते राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडणार नाही, संघटनेची जबाबदारी स्वीकारणार नाही, असं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं. भाजपा आणि संघात विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं समन्वयासाठी अनेक बैठका झाल्या. संघ परिवार संपूर्ण ताकदीनिशी भाजपासाठी दैनंदिन काम करत होता," असं देखील दिलीप देवधर म्हणाले.
अजित पवारांचा सरकारमध्ये समावेश का? :सुरुवातीच्या बैठकांमध्ये भाजपाला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन नेमका काय फायदा झाला? असे प्रश्न संघटनांकडून विचारण्यात आले. 23 जुलै रोजी मुंबईतील लोअर परळ भागातील प्रभादेवीमध्ये यशवंत भवनात आरएसएसचे सहसरकार्यवाह अरुण कुमार, दुसरे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर संघ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांचा सरकारमध्ये समावेश का करण्यात आला? यावर चर्चा झाली. या सर्व घडामोडी वेगात घडत असताना त्याच रात्री अजित पवार दिल्लीला रवाना झाले होते.