ठाणे - बांगलादेशात भारतीयांवर होणारे अन्याय, अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असतानाच भिवंडीत अवैधपणे घुसखोरी करून भाड्यानं राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई पोलिस प्रशासनानं तीव्र केली आहे. भिवंडी तालुक्यातील मानकोली येथील एका गोदामात अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या ७ बांगलादेशी घुसखोरांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्यावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिन्याभरातच भिवंडीतील घुसखोर बांगलादेशींचा हा आकडा ३० वर जाऊन पोहचला आहे. इमोन अरसद खान (२८), मोहंमद फजरअली जोसेफउददीन (५४), इआनुल इकलाज मंडल (२६), डॉली शाहीद अन्सारी (३५), राणी कासिम शेख (२८), लीमा हमीन खान (२६), शिवली अब्दुलरज्जाक कलाम (२७) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशींची नावं आहेत.
बिगारी काम करून उदरनिर्वाह - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व बांगलादेशी अवैधपणे मानकोली येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील बी-६ मध्ये असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता गोदाम क्र.२०५ मध्ये पोलिस पथकासह सापळा रचून सर्वांना ताब्यात घेतलं. दरम्यान त्यांच्याकडे चौकशी केली असता वरील सर्व अवैधपणे बांगलादेश सीमेवरून भारतात येवून भिवंडीत राहात असल्याचं निष्पन्न झालं आहे. ७ जणांवर पोलीस शिपाई काशिनाथ पांडुरंग ठोमरे यांच्या फिर्यादीवरून नारपोली पोलीस ठाण्यात पारपत्र (भारतात प्रवेश) नियम १९५०, कलम ३ सह ६, परकीय नागरिक आदेश १९४८ परिच्छेद ३ (१), विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १४ न्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ३५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून यामधील काही जण प्लंबर काम तर काही बिगारी काम करून उदरनिर्वाह करत असल्याचं समोर आलं आहे. पुढील तपास सपोनि माणिक होळकर करीत आहेत.
छुप्या मार्गाने भारतात दाखल - आर्थिक टंचाई, शिक्षणाचा अभाव व प्रचंड बेरोजगारी यामुळे बांगलादेशातील नागरिकांवर बेरोजगारी व उपासमारीचे संकट ओढवले आहे. आर्थिक टंचाईवर मात करण्यासाठी येथील अनेक बांगलादेशी नागरिक बांगलादेशातून पळ काढून छुप्या मार्गाने भारतात दाखल होतात. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांगलादेशी नागरिकांकडे भारतात येण्यासाठी आवश्यक पारपत्र व परवाना तसंच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र या सर्व शासकीय नियमांना बगल देऊन केवळ दलालाच्या मध्यस्थीने छुप्या व अवैध मार्गाने अनेक बांगलादेशी भारतात येतात.
दलाल घेतात ५ ते ७ हजार रुपये - भिवंडीत अवैध राहात असलेले बांगलादेशी नागरिक दलालाला पाच ते सात हजार रुपये देऊन भारतात येतात. हेच दलाल दलाल त्यांच्यासाठी भारतातील पॅन कार्ड, आधार कार्ड व इतर बोगस कागदपत्रं तयार करून देतात. तर बारमध्ये काम करणाऱ्या बांगलादेशी तारुणींकडून १० ते १५ हजार हे दलाल घेत असतात.
राजकीय फायद्यासाठी कारवाई - शहरात मागील अनेक वर्षांपासून बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य आहे. मात्र बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांमुळे शहरात बांगलादेशी नागरिकांची धरपकड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या बांगलादेशी नागरिकांवर केलेल्या कारवाईचा फायदा निवडणुकी दरम्यान राजकीय व्यासपीठांवरून होऊ शकतो. त्यामुळे या कारवाईकडे विशेष लक्ष दिलं जात असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.
कारवाई होणारच - भिवंडीत राहात असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात येते मागील काही दिवसांपासून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मात्र अटक केलेले हे बांगलादेशी नागरिक देशविघातक कृत्याशी संबंधित आहेत किंवा नाही हा तपासाचा भाग असला तरी असामाजिक तत्वांशी त्यांचा संबंध असून बेकायदेशीर शहरात राहाणे हा दखलपात्र गुन्हा असल्यानं यापुढेही शहरात अवैध राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया भिवंडी पोलीस उपायुक्त मोहन दहिकर यांनी दिली आहे.
हेही वाचा..