नागपूर : नवं वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर शहरातील कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुहेरी हत्याकांड उघडकीस आलय. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानं स्वतःच्या आई-वडिलांना संपवल्याचं तपासात उघड झालं आहे. लीलाधर डाकोडे आणि अरुणा डाकोडे असं हत्या झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे. लीलाधर आणि अरुणा यांचा मुलगा उत्कर्ष यानेचं आई-वडिलांची हत्या केल्याची माहिती पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली.
पोटच्या पोरानं केली आई-वडिलांची हत्या : २६ डिसेंबरला आरोपीने आई-वडिलांची हत्या केली होती. लीलाधर डाकोडे कोराडी पॉवर प्लांटमधून सेवा निवृत्त झाले होते. तर अरुणा या शिक्षिका होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली.
इंजिनिअरिंग सोडून देण्यास सांगितल्यामुळं केली हत्या : आरोपी उत्कर्ष डाकोडे अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो अभियांत्रिकीचा अभ्यास पूर्ण करू शकला नाही. त्यामुळं आई-वडील त्याला अन्य कोर्समध्ये ऍडमिशन घेण्याचा सल्ला वारंवार देत होते. त्यामुळं आरोपी उत्कर्ष बेचैन राहू लागला. त्याच रागातून आई-वडिलांची हत्या केल्याची कबुली आरोपी उत्कर्षनं पोलिसांना दिली.
आई-वडील मेडिटेशनला गेल्याचा केला बनाव : उत्कर्षनं आई-वडिलांची हत्या 26 डिसेंबर रोजी केली. त्यावेळी त्याची बहीण ही कॉलेजला गेली होती. मात्र, ज्यावेळी ती घरी परत आली तेव्हा आई-वडील मेडिटेशनकरता बंगलोरला गेले असल्याचा बनाव आरोपीनं रचला आणि तिला काकाच्या घरी सोडून दिलं. या सात दिवसांमध्ये आरोपी उत्कर्षनं बहिणीला तिच्या घरी जाऊ दिलं नाही. त्यामुळं हे हत्याकांड उघडकीस येण्यास उशीर झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारे हत्या होत असल्यानं पालकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. मुलांची मानसिकता ओळखून त्यांना काय आणि किती बोलावे याचीही पालकांनी तेवढ्याच गांभिर्यानं काळजी घेतली पाहिजे हेच या प्रकरणातून दिसून येत आहे.
हेही वाचा -