कोल्हापूर: फेब्रुवारी महिन्यात 'चॉकलेट डे' ते 'व्हॅलेंटाईन डे' साजरे केले जातात. मात्र, दुसऱ्या बाजूला या समाजात असे देखील नागरिक आहेत जे हे दिवस साजरे न करता, भुकेल्यांसाठी एक दिवस म्हणत 'रोटी डे' (Roti Day) साजरा करतात. गेल्या 8 वर्षापासून कोल्हापुरातील नागरिकांकडून 'रोटी डे' साजरा केला जात आहे. यात अन्न, धान्य, मिठाई, बिस्कीट गोळा करून भुकेलेल्याना खाऊ घालतं जातं. अशी माहिती शितल पंदारे यांनी दिली.
कशी सुचली कल्पना? : अन्न, वस्त्र, निवारा आणि आता इंटरनेट या माणसाच्या 4 मूलभूत गरजा बनल्या आहेत. बदलत्या ऑनलाईनच्या काळात व्हॅलेंटाईन डे सारखे अनेक वेस्टर्न कल्चरचे सण साजरे केले जात आहेत. यावर अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच टीका करतात. 8 वर्षांपुर्वी एक पोस्ट व्हायरल झाली होती. त्यात लिहलं होतं की, "एखादया भुकेल्यांसाठी रोटी डे साजरा केला असता तर, कोणताच गरीब उपाशी झोपला नसता". यातूनच प्रेरणा घेत आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी कोल्हापुरात "रोटी डे" साजरा करत असल्याची माहिती, अध्यक्ष निलेश बनसोडे यांनी दिली.
कोल्हापूरात रोटी डे उपक्रम साजरा (ETV Bharat Reporter) नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद: "कोल्हापूर शहरातील युवक-युवती एकत्र येत कोल्हापूर युथ मुव्हमेंटची स्थापना केली आणि रोटी डे साजरा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात लोकांना माहित नसल्यानं प्रतिसाद मिळाला नाही. मात्र जसं सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना याची माहिती मिळत गेली तसं अनेक दातृत्वांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. सध्या या उपक्रमाची चर्चा सर्वत्र सुरू असून अनेक लोकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे जितके लोक या उपक्रमात सहभागी होत आहेत तितकेच गरीब लोक या उपक्रमाचा लाभ देखील घेत आहेत. तर घरात शिजवलेलं अन्न देखील अनेक भुकेले घेऊन जात असल्याची माहिती, प्रियंका मोरे यांनी दिली.
आश्रमशाळांना अन्न, धान्य वाटप :या उपक्रमास आवाहन केल्यानुसार, कोल्हापूरकर शिजवलेलं अन्न, कडधान्य, तांदूळ, गहू, डाळ, मीठ, साखर, तेल आणि कोरडा खाऊ म्हणजेच बिस्किट, फरसाण यासारखे जीवनावश्यक वस्तू आणून देत आहेत. तसेच हे सर्व शिजवलेलं अन्न कोल्हापुरातील विविध भागामध्ये जे गरीब आणि उपाशी आहेत त्यांना वाटलं जातं आहे. तसेच कोरडं अन्न, धान्य एखाद्या गावातील गरीब कुटुंबांना किंवा आश्रमशाळांना देण्यात येत असल्याची माहिती, शितल पंदारे यांनी दिली.
हेही वाचा -
- Rajasthan Roti : ऐकावं ते नवलच! राजस्थानात बनवली जगातील सर्वात मोठी 'महारोटी'; व्हिडिओ बघून व्हाल थक्क
- Roti Day in Kolhapur : कोल्हापुरात भुकेल्यांसाठी साजरा होतो रोटी डे
- जॅकलिन फर्नांडिजने मुंबईत गरजूंना केले अन्नवाटप