पुणेRohit Pawar PC: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, "आज राज्याची जी राजकीय परिस्थिती झाली आहे, त्याचा कर्ताधर्ता कोण असेल ते देवेंद्र फडणवीस आहेत. 2014 नंतर राज्याची राजकीय संस्कृती ही कोणामुळे खाली आली असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाली आहे. पक्ष आणि कुटुंब फोडणं हे फडणवीसांचं काम आहे. त्यांनी स्वतः सांगितलं आहे की, मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो आहे. हा पुन्हा आलेला अहंकार लोकच या निवडणुकीत पायाखाली तुडवतील."
सुप्रिया सुळे 3 लाख मतांनी निवडून येतील :प्रवीण माने यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. याबाबत पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "प्रवीण माने यांचा खूप मोठा व्यवसाय आहे. त्यांची खूप मोठी संपत्ती आहे. त्यामुळे माने मनातून गेले की, त्यांना मारुन नेलं हे बघावं लागेल. आज नेते गेले मात्र लोक आपल्या सोबत असून सुप्रिया सुळे 3 लाख मताच्या लीडनं निवडून येतील," असा विश्वास यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
खडसेंना भाजपा जेलमध्ये टाकू शकते :एकनाथ खडसे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा आहे. याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "मी त्यांच्या बद्दल बोलणार नाही. त्यांच्या अडचणी खूप आहेत. भाजपा खोट्या फाईल काढून त्यांच्यावर कारवाई करू शकते. खडसेंची तब्येत खूप खराब आहे. अशा तब्येतीत त्यांना भाजपा जेलमध्ये देखील टाकू शकते. भाजपानं असे खोटे आरोप करुन अनेक नेत्यांची ताकद कमी केली. नेत्यांना भीती दाखवली जात आहे. खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं असावं. खोट्या फाईल काढून जसं केजरीवाल यांना आत टाकलं तसं त्यांचा प्लॅन असेल. म्हणून ते पक्ष प्रवेश करत असावे."