पुणे Rohit Pawar On Devendra Fadnavis :राज्यात गुंडांचे राज्य असून भाजपाला निवडणुका जिंकण्यासाठी गुंडांची मदत घ्यावी लागते, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत गुंडांचे फोटो येत आहेत. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, "राज्याच्या गृहमंत्र्यांना कोण गुन्हेगार आहे, कोण कुणाला भेटत आहे, याची सगळी माहिती असते. मात्र जाणून देवेंद्र फडवणीस यांच्यासोबतचे गुंडांचे फोटो बाहेर येत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे फोटो बाहेर मुद्दामून व्हायरल केले जात आहेत," अशी टीका रोहित पवार यांनी केली. महायुती सरकारमधील अंतर्गत वादातून हे सगळं होत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
सामान्य माणसांची कुत्र्यांसोबत तुलना :गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. परंतु राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस हे सामान्य माणसांची कुत्र्यांसोबत तुलना करत आहेत. त्यामुळं त्यांना राज्याचे काही देणंघेणं राहिलं नाही. राज्यात गुंडांचं राज्य आलं असून भाजपाला गुंडांच्या बळावर विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवायच्या आहेत. अगोदर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करतच आहेत. त्यासोबतच गुन्हेगारांचा सुद्धा वापर करण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच या सगळ्या गोळीबारांच्या घटना घडत आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केलेली आहे.