नागपूर : दरोडेखोरांनी एकाचं कुटुंबातील पाच सदस्यांना बंधक बनवून लाखोंची नगदी आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीतील खसाला भागात ही घटना घडली आहे. तोंड झाकून आलेल्या दरोडेखोरांनी धारदार शस्त्राच्या धाकावर संपूर्ण कुटुंबाला बंधक बनवून लाखो रुपयांची लूट केली. ही घटना बुधवारी रात्री 2.30 वाजताच्या सुमारास घडली आहे. राजेश पांडे असं लुटण्यात आलेल्या कुटुंबप्रमुखाचं नाव असून ते एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
खिडकीची लोखंडी ग्रील तोडून घुसले दरोडेखोर :राजेश पांडे हे एका ट्रान्सपोर्ट कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. आपल्या कुटुंबासोबत ते खसाला टोली प्लॉट नंबर 38 इथं राहतात. रात्री अडीच वाजताच्या सुमारास दरोडेखोरांनी घराच्या सुरक्षा भिंतीवरून घराच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश केला. त्यावेळी पांडे कुटुंबीय गाढ झोपेत होते. खिडकीची लोखंडी ग्रील तोडून आरोपींनी घरात प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत राजेश पांडे यांची पत्नी, त्यांच्या मुलीला बंधक बनवलं. आरोपींनी घरातील पाच लाख रुपयांची नगदी आणि सोन्याचे दागिने लंपास केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.