पुणेLOK SABHA ELECTIONS 2024 :देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी दिली आहे. मात्र, शरद पवारांना देखील बारामती मतदारसंघातून भारतीय गीग कामगार मंच तसंच बघतोय रिक्षावाला संघटनेकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
बारामतीतून शरद पवारांना उमेदवारी : गीग कामगार मंच तसंच बघतोय रिक्षावाला संघटनेकडून शरद पवार यांच्यासहित पुणे जिल्ह्यात 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात बारामतीमधून रिक्षाचालक शरद पवार यांना, तर पुणे लोकसभा मतदार संघातून टेम्पो चालक मनोज वेताळ, मावळमधून कॅब चालक संतोष वालगुडे, शिरूरमधून फूड डिलिव्हरी बॉय स्वप्नील लोंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांच्या प्रचारार्थ 18 तसंच 24 एप्रिल रोजी प्रचार सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. तसंच बारामतीमधून शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे.