मुंबई Rat Found In Mahaprasad : मुंबईतील प्रसिद्ध आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. सिद्धिविनायक मंदिराचे प्रसादाचे लाडू जिथं ठेवले जातात तिथं उंदराची पिल्लं आढळली असल्याचा दावा करण्यात येत आहे. यासंबंधीत एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
ट्रेमध्ये उंदराची पिल्लं : ट्रस्टच्या वतीनं भाविकांना अल्पदरात महाप्रसादाचे (लाडू) वाटप करण्यात येते. प्रसादाच्या एका पॅकेटमध्ये 50 ग्रॅमचे दोन लाडू असतात. मात्र, महाप्रसाद ठेवण्यात येणाऱ्या ट्रेमध्ये उंदराची पिल्लं आढळल्याचा आरोप केला जातोय. यामुळं महाप्रसादाच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मंदिर प्रशासनानं हे आरोप खोटे असल्याचं सांगितलं. मात्र, असं असलं तरी या व्हायरल व्हिडिओमुळं भाविकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.
सदा सरवणकर काय म्हणाले? : यासंदर्भात प्रतिक्रिया देत शिवसेना नेते आणि सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट (SSGT) चे अध्यक्ष सदा सरवणकर म्हणाले की, "महाप्रसाद बनवण्यात येणारी जागा अतिशय स्वच्छ आहे. ही जागा नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो. तूप, काजू आणि जे काही तयार केलं जातं ते सर्वप्रथम बीएमसीच्या प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवलं जातं. व्हायरल व्हिडिओमध्ये प्लास्टिकमध्ये भरलेलं काहीतरी दिसतंय. परंतु, तो व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, हा व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातील नक्कीच नाही."