मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारण चांगलंच तापलं असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवावा यावरून उद्धव ठाकरे सातत्याने वक्तव्य करीत आहेत, त्यांच्या या वक्तव्याचा भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी समाचार घेत त्यांना सल्ला दिलाय. तसेच मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल, असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय. मुंबईत ते बोलत होते.
एका दिवसात ३ मुख्यमंत्री : पुढे रावसाहेब दानवे म्हणाले की, ज्या दिवशी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर होईल, त्यादिवशी महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे सहा पक्ष होतील. उद्धव ठाकरे यांची ही चाल आहे. निवडणुकीपूर्वी जर मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं, तर नंतर यांना भूमिका घ्यायला जागा राहणार नाही. परंतु शरद पवार हे त्यांचे गुरू आहेत. कारण मागील पाच वर्षं शरद पवार यांच्या बोलण्याप्रमाणे राजकारणाचा खेळ सुरू आहे. शरद पवार हे काही कच्च्या गुरूचे चेले नसून ते यशवंतरावांसारख्या पक्क्या गुरूचे चेले आहेत. असे कित्येक उद्धव ठाकरे ते उडवून घेऊन जातील, याचा पत्तासुद्धा लागू देणार नाहीत. म्हणून ते महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? हे आता घोषित करणार नाहीत. पण मुख्यमंत्रिपदासाठी प्रत्येकाची दावेदारी आहे. संजय राऊत सकाळी उठतात आणि सांगतात आम्ही मोठे भाऊ आहोत, आमचाच मुख्यमंत्री होणार आहे. दुपारी जयंत पाटील त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्ही काय बोलले.. असे विचारल्यावर ते पुन्हा पलटी मारतात. संध्याकाळी विजय वडेट्टीवार म्हणतात, आमचाच मुख्यमंत्री होणार आहे. अशा प्रकारे एकाच दिवसात यांचे तीन मुख्यमंत्री होतात. म्हणून महाराष्ट्रातील जनता यांना पूर्णपणे ओळखून आहे. जिथे यांचा मुख्यमंत्री होणार नाही, तिथे यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. या राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे, असंही दानवे म्हणालेत.
जनतेच्या मनामध्ये एक ऊर्जा असायची :शिवतीर्थ तसेच आझाद मैदान या ठिकाणी होणाऱ्या दोन्ही दसरा मेळाव्यासंदर्भात बोलताना दानवे म्हणाले की, दसरा मेळावा आयोजित करण्याची परंपरा बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून सुरू झालेली आहे. बाळासाहेबांच्या काळात जे दसरे मेळावे व्हायचे, त्या मेळाव्यामध्ये बाळासाहेब हे महाराष्ट्राच्या जनतेला जे उद्देशून म्हणायचे त्यातून वर्षभर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये एक ऊर्जा असायची. खरोखर दसऱ्याला सोनं लुटल्याचा जो आनंद असतो, तो बाळासाहेबांच्या शब्दातून प्रकट व्हायचा. जनता त्यातून काहीतरी बोध घ्यायची. परंतु आता जे काही उद्धव ठाकरे यांचे दसरे मेळावे होत आहेत, त्यांनी जो काही त्यांचा टीझर प्रकाशित केलाय, त्यातून हे लक्षात येतं की, फक्त आणि फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा यांच्याबाबत वाईट प्रचार करायचाय. परंतु यांनी आता जनतेची कितीही दिशाभूल केली तरी जनता त्यांना बळी पडणार नाही. म्हणून दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार? हे आतापासून जनतेला माहीत असल्या कारणाने या दसरा मेळाव्याबद्दल जनतेच्या मनात फार उत्कंठा आहे, असं समजण्याचं काही कारण नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.
आमच्या कामगिरीवर जनतेमध्ये जाऊन मतं मागणार :जम्मू - काश्मीरमध्ये झालेल्या पराभवाबद्दल बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, निवडणुकीमध्ये हार-जीत होत असते. लोकसभा निवडणुकीत आमची हार झाली असली तरीसुद्धा ती आम्ही मान्य केलेली आहे. तो जनतेचा जनादेश असतो आणि तो स्वीकारावा लागतो. परंतु येत्या निवडणुका भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकतीने लढणार आहे. जनतेच्या हितासाठी सरकारने जे काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत, ते आम्ही जनतेला पटवून सांगणार आहोत. मागच्या १० वर्षांतील मोदी सरकारची जी काही कामगिरी आहे, त्या कामगिरीवर आम्ही जनतेमध्ये जाऊन मतं मागणार आहोत. मागच्या तीन वर्षांत आम्ही जे काही निर्णय घेतले, त्याबाबत एखादं सकारात्मक वक्तव्य महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्यांनी केलेलं नाही. आम्ही जे काही निर्णय घेतो, त्याला विरोध करणे हाच महाविकास आघाडीचा धंदा आहे. कुठलाही निर्णय हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला जात नाही. जनतेच्या काही वर्षानुवर्षाच्या मागण्या असतात त्या पूर्ण कराव्या लागतात, असंही ते म्हणालेत.
हेही वाचा
- विदर्भासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 'मिशन 51'; भाजपाला तारणार का?
- महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका; 'हे' घेतले महत्त्वाचे ३८ निर्णय