मुंबई Ramdas Athawale on Uddhav Thackeray : संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार करणारी काँग्रेस स्वतः धोक्यात आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. सोबतच "बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसच्या विरोध केला, त्याच काँग्रेस सोबतच आज उद्धव ठाकरे गेले आहेत. आज बाळासाहेब हयात असते, तर त्यांनी उद्धव ठाकरेंना घराबाहेर काढलं असतं" अशी जोरदार टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. बुधवारी सायंकाळी बरकत अली नाका, वडाळा इथं महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. या सभेत विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, अभिनेता गोविंदा आदी उपस्थित होते.
फोडा आणि राज्य करा ही काँग्रेसची नीती :महायुतीच्या प्रचार सभेत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, "काँग्रेसनं नेहमीच फोडा आणि राज्य करा ही नीती वापरुन राज्य केलं. आजही संविधान धोक्यात आहे, असा अपप्रचार करुन काँग्रेस मागासवर्गीय आणि मुस्लिमांना घाबरवत आहे. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसच धोक्यात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसवर टीका केली, त्याच काँग्रेससोबत आज उद्धव ठाकरे गेले आहेत. त्यामुळे आज बाळासाहेब हयात असते, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना घराबाहेर काढलं असतं," अशी टीकाही रामदास आठवले यांनी केली. महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा राहुल शेवाळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असं आवाहनही यावेळी आठवले यांनी केलं.