मुंबई - विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा देणारे राज ठाकरे यांनी राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि ते देवेंद्र फडणवीस असतील, असं म्हटल्यानं राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरलाय. राज ठाकरे यांनी त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. तर अमित ठाकरे यांच्या विजयासाठी भाजपाने कंबर कसली आहे. यावरून मनसे आणि भाजपची जवळीक मोठ्या प्रमाणात वाढली असून," मिले सुर मेरा तुम्हारा, तो स्वर बने हमारा" या पद्धतीने सध्या यांच्या छुप्या युतीकडे बघितलं जातंय. त्यातच मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर लढणाऱ्या मनसेला उत्तर भारतीयांची मतं भेटणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता, राज ठाकरे यांची भूमिका बदलली असून, त्यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगत राज ठाकरेंची पाठराखण केलीय. मुंबईत प्रदेश कार्यालयात ते बोलत होते.
मुख्यमंत्रीसुद्धा महायुतीचाच होणार : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल व ते देवेंद्र फडणवीस असतील असं म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी त्यांचे आभार मानले आहेत. राज ठाकरे यांच्या शुभेच्छा त्यांनी आभाराने स्वीकारल्या आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, राज्यात भाजपचे नाही तर महायुतीचे सरकार येणार असून मुख्यमंत्री सुद्धा महायुतीचाच होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेत आता बदल झाला आहे. राज ठाकरे यांनी आता व्यापक हिंदुत्वाची भूमिका हाती घेतली आहे. क्षेत्रीय अस्मितेला सुद्धा भाजपचं नेहमीच समर्थन राहिलं आहे. परंतु राष्ट्रीय अस्मितेचा सुद्धा विचार होणे तितकेच महत्त्वाचे आहे. आणि ही राष्ट्रीय अस्मिता म्हणजेच हिंदुत्व हे आता राज ठाकरेंनी स्वीकारले आहे, असेही फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर अमित ठाकरे यांना माहीम मध्ये पाठिंबा देण्याबाबत आमची बोलणी सुरू आहेत. आम्ही सर्व एकत्र येऊन यातून मार्ग निघाला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.