मुंबईEknath Shinde : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू समाजाचा अपमान केला आहे. हिंदू समाज हिंसक असल्याचं वक्तव्य त्यांनी लोकसभेत केलं. त्यामुळं देशातील कोणताही हिंदू राहुल गांधींना माफ करणार नाही, हिंदू समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा बदला हिंदू समाजाकडून योग्य वेळी नक्की घेतला जाईल. त्यांना त्यांच्या वक्तव्याचं उत्तर नक्की मिळेल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन प्रांगणात पत्रकारांशी बोलताना दिला. राहुल गांधींनी विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हे वक्तव्य केल्याचा आणि हिंदू समाजाचा अपमान केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. हिंदू समाज हा सहिष्णू, संयमी आहे. मात्र, असं वक्तव्य करणं अत्यंत चिंताजनक आहे. विरोधी पक्षांच्या टीकेकडं आम्ही फारसं लक्ष देत नाही, असं देखील ते म्हणाले.
नागरिकांना मदत करण्याचं सरकारचं काम : आम्ही आमचं काम योग्य पद्धतीनं करतोय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्याचं काम आम्ही केलं आहे. वारकऱ्यांच्या दिंड्यांना निधी दिला जात आहे. मात्र, हे सहन होत नसल्यानं आता विरोधक आमच्यावर आरोप करत आहेत. अशा आरोपांकडं आम्ही लक्ष देत नसल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. हिंदूंना हिंसक म्हटलं, हिंदूंचा अपमान केला, हा कसला दुटप्पीपणा, असा प्रश्नही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ : या सर्व योजनांसाठी आम्ही पुरेशा निधीची तरतूद केलेली आहे. आम्ही ज्या योजना जाहीर केल्या आहेत, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. त्यामुळं विरोधकांनी काळजी करण्याची गरज नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 15 जुलैपर्यंतची मुदत होती. ती आता 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळं महिलांनी गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.