रंगपंचमीनिमित्त नाशिककरांचा उत्साह नाशिक Rahad Rangpachami : नाशिकमध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. यंदा सहा पेशवेकालीन रहाडींमध्ये नाशिककर धप्पा मारुन रंगपंचमी साजरी करत आहेत. नाशिकमध्ये अडीच शतकापासून रहाड परंपरा चालत आलीय. पेशवेकाळात या रहाडी पेशव्यांच्या सरदारांच्या अखत्यारित होत्या. त्यानंतर तालमीच्या अखत्यारीत झाल्या दरम्यानच्या काळात आता स्थानिक मंडळाकडून यांचा कारभार बघितला जातो.
सहा ठिकाणी होणार रंगोत्सव साजरा : देशभरात होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. मात्र सांस्कृतिक आणि पौराणिक वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. नाशिकमध्ये 18 व्या शतकात तब्बल 18 रहाडी अस्तित्वात होत्या. मात्र काळाच्या ओघात त्यातील काही बुजल्या गेल्या काही रहाडींवर वाडे बांधले गेल्यानं त्यांचं अस्तित्व नामशेष झालं. पण आता त्यातील प्रामुख्यानं पाच रहाडी रंगउत्सवा दरम्यान कार्यरत आहेत. तर नुकतीच जुने नाशिकच्या मधल्या होळीत सुरु झालेल्या मेट्रो सिटीच्या खोदकामादरम्यान सहावी रहाड मिळून आली. त्यामुळं आता नाशिकमध्ये सहा ठिकाणी रहाडीत रंग उत्सव साजरा होणार आहे.
रंगपंचमीला खुल्या केल्या जातात रहाडी : नाशिक शहरातील तिवंधा चौक, शनी चौक, गाडगे महाराज पूल, जुनी तांबट गल्ली, बागवानपूरा, मधली होळी अशा सहा ठिकाणी पेशवेकालीन रहाड रंगोत्सव साजरा केला जाणार आहे. नाशिक मध्ये 250 वर्षांपासूनची रहाड परंपरा आजही कायम आहे. रंगपंचमीला अवघे काही तास शिल्लक असल्यानं शहरात असणाऱ्या चार ठिकाणच्या बुजवलेल्या रहाडी खुल्या करुन त्यांची साफसफाई करण्यात आलीय. 25 बाय 25 फुटांचा चौरस आणि साधारणपणे 10 ते 12 फुटांची खोली असलेल्या हौदात नैसर्गिक फुलांपासून तयार केलेले रंग टाकले जातात आणि रंगपंचमीच्या दिवशी दुपारी 2 वाजेनंतर या रहाडीची पारंपरिक पूजा करुन नाशिककर नागरिक या रहाडीत उडी मारुन रंगोत्सव साजरा करतात.
नैसर्गिक रंगांचा वापर :या राहाडीत नैसर्गिक फुलांपासून तयार केलेले रंग टाकले जातात ज्यामुळं त्वचारोग होत नाही. तसंच उन्हाळ्यात ऊन लागत नाही अशीही आख्यायिका आहे. त्यामुळं आबालवृद्धांपासून युवकांची इथं रंग खेळण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. यात शनिचौक पंचवटी (गुलाबी रंगाची) गाडगे महाराज पुलाजवळ (पिवळा रंग) रोकडोबा तालीम संघ, मधळी होळी तालमी जवळ (केशरी नारंगी) असे याचे वैशिष्ट आहे. हे रंग विविध प्रकारच्या वनस्पतीच्या फुलांपासूनतयार केला जातो. त्या फुलांना सुमारे दोन तास एका मोठ्या भांड्यात टाकून उकळविले जाते या रहाडीतील रंग इतका पक्का असतो की एकदा यात उडी मारली की किमान दोन दिवस तरी रंग निघत नाही. हजारो मंडळी यात उड्या मारुन आनंद साजरा करतात. संपूर्ण नाशिक शहरात आधी 17 राहाडी अस्तित्वात होत्या. आता सहा असून अगोदर या रहाडी पेशवे सरदारांच्या अखत्यारीत होत्या. मात्र आता त्या कालांतरानं तालीम संघांच्या अखत्यारित आहेत.
शॉवर रंगपंचमी : नाशिकमध्ये गेल्या सात ते आत वर्षांपासून शॉवर रंगपंचमी खेळली जाते. शहरात ठीक ठिकाणी उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. भद्रकाली परिसरातील गाडगे महाराज पुतळा, बुधवार पेठ, साक्षी गणेश मंदिर अशा प्रमुख ठिकानी शॉवर रंगोत्सवानिमित्त तयारी सुरु झालीय. तर बाजारात देखील लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या आकर्षक पिचकाऱ्या विक्रीसाठी दाखल झाल्या असून त्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होतेय. आमच्या लहानपणी गल्ली-गल्लीची मंडळं ताशे वाजवत बैलगाड्यांवर रंगपंचमी खेळायला यायची. वाजत, गाजत कार्यकर्ते रहाडीत उड्या मारत आनंद लुटायची, आमच्या मंडळाचे कार्यकर्ते रंग खेळून रहाडीतून टिपडे भरुन पुन्हा बैलगाडीवर ठेवून पुढच्या रहाडीकडे जात रंगपंचमीचा जल्लोष साजरा करत असे, अशी माहिती दंडे हनुमान मित्रमंडळाचे अध्यक्ष गजानन शेलार यांनी दिली.
हेही वाचा :
- ठाण्यात जादुई रंगपंचमी; होळीसाठी बाजारपेठेत "कलर लगाओ, कलर भगाओ छू मंतर" - Holi Festival 2024