पुणे Controversial IAS Pooja Khedkar : प्रचंड अभ्यास आणि मेहनत करुन विद्यार्थी आयएएस, आयपीएस दर्जाचे अधिकारी बनतात. त्यामुळं त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनही पॉझिटिव्ह असतो. घरातील पालक आपल्या मुलांनाही अशाच सक्सेस झालेल्या अधिकाऱ्यांबद्दल सांगत असतात. त्यांना रोल मॉडेल बनवतात. त्यामुळं असे वरिष्ठ सनदी अधिकारी आपली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करत असतात. आयएएस पूजा खेडकर यांच्याबाबत मात्र वेगळंच घडताना दिसतंय. वाचा 'ऑडी'ची कहाणी....
'ऑडी'वर 21 चलन : प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या गाडीनं वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलं. त्यांच्या ऑडी कारवर वाहतुकीचे नियम मोडल्या प्रकरणी 21 चलन असल्याचं समोर आलं आहे. पूजा खेडकर यांची नुकतीच वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. पुणे जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असताना त्यांनी नियम धाब्यावर बसून त्यांच्या खासगी ऑडी कारवर अंबर दिवा लावला होता. तसंच त्यांनी कारवर 'महाराष्ट्र शासन' असं लिहिलं होतं. तेव्हापासून पूजा खेडकर देशभरात चर्चेत आहेत. पुणे जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांच्याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली. पूजा खेडकर यांच्या आलिशान ऑडी कारवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 21 दंड आकारल्याचं समोर आलं आहे.
व्हॉट्स अँपवर पाठवली नोटीस : पूजा खेडकर यांच्या बंगल्याबाहेर झाकून ठेवण्यात आलेली ऑडी कार त्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी वापरत होत्या. या कारवर त्यांनी 'महाराष्ट्र शासन' अशी पाटी लावली होती आणि नारंगी रंगाचा दिवा लावला होता. पोलिसांच्या मते हा वाहतूक नियमांचा भंग असून, पोलिसांनी १७७ अंतर्गत कारवाई करायचं ठरवलंय. त्यासाठी पुणे पोलीस खेडकर यांच्या बाणेर रस्त्यावरील बंगल्यासमोर आले असता पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना व्हॉट्स अँपवर नोटीस पाठवली. या नोटीशीत MH -12 AR 7000 क्रमांकाच्या या गाडीचा उपयोग नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याने तपास करायचा आहे, असं सांगत ही गाडी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागात जमा करण्यास सांगण्यात आलंय.
मनोरमा खेडकरांनी घातला वाद : वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या महिला अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना धमकी दिली. "जर तुम्ही गेटच्या आत येण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हा सर्वांना तुरुंगात टाकेन," असं त्या म्हणाल्या. यावेळी विविध माध्यमांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. पूजाची आईही त्यांच्यावर धावली. त्यामुळं या कारवाईवरून पोलीस आणि पूजाच्या कुटुंबीयांमध्ये बराच वेळ वाद सुरू होता. धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.