पुणे Pune Rain News : पुणे शहरात तसंच घाट माथ्यावर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून खडकवासला धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. मागील आठवड्यात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीनं पुणे शहरातील अनेक भागात नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं. तसंच सिंहगड रोड येथील एकता नगर परिसरात देखील पाणी साचल्यामुळं नागरिकांना मोठ्या समास्यांना सामोरं जावं लागतंय.
पुण्यात पावसाचा कहर (ETV Bharat Reporter) हवामान विभागानं पुणे शहरात रेड अलर्ट दिला आहे. शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस होत आहे. एकता नगर परिसरात पुन्हा एकदा पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. सिंहगड रस्ता, एकता नगर येथे पाण्याची पातळी वाढत असल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांनी सद्यस्थितीत जवळपास 25 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलंय.
जिल्हाधिकारी काय म्हणाले? :यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले की, "भारतीय हवामान खात्याकडून घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आलाय. धरण क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पावसाचा जोर वाढलाय. खडकवासला धरणाची पातळी नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्रीपासूनच नागरिकांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. येरवडा आणि पिंपरी चिंचवड तसंच पुण्यातील काही भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय. सकाळी साडेदहाच्या सुमारास खडकवासला धरणातून 35 हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पुणे प्रशासन या परिस्थितीचा सामना करण्यात तयार आहे. आमच्या सर्व तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका. तसेच वृद्ध आणि बालकांना घराबाहेर सोडू नका," असं आवाहनदेखील यावेळी जिल्हाधिकारी यांनी केलं आहे.
खडकवासला धरणातून 45 हजार क्युसेक विसर्ग :सायंकाळी 5 वाजता 35 हजार क्युसेक विसर्ग वाढवून 45 हजार 705 क्यूसेक करण्यात आलाय. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानूसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता असल्याचं पाटबंधारे विभागानं सांगितलंय. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडकवासला धरण 65 टक्क्यांपर्यत खाली करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिलेत. त्यानुसार विसर्ग वाढवण्यास सुरुवात झालीय.
हेही वाचा -
- पुण्यात पुरसदृश परिस्थिती, सिंहगड रोड संपूर्ण पाण्यात; प्रशासनाच्या वतीनं बचावकार्य सुरू - Pune Rain Updates
- पुण्यात मुसळधार पावसामुळं अनेक घरांमध्ये शिरलं पाणी; पाहा व्हिडिओ - Pune rain updates
- 'बाबा भिडे' पूल पाण्याखाली, स्टॉल हलवताना करंट लागून तिघांचा मृत्यू - Pune Rain News