अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द (Reporter) पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आलाय. त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणातील त्या अल्पवयीन तरुणाला आज बाल न्याय मंडळात हजर करण्यात आलं होतं. दिवसभर चाललेल्या सुनावणीनंतर बाल न्याय मंडळाने निर्णय दिला असून त्या अल्पवयीन तरुणाचा जामीन रद्द केला. त्या अल्पवयीन तरुणाला 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांकडून त्या अल्पवयीन मुलाच्या विरोधात जी कलमवाढ केली आहे, त्यानुसार त्या अल्पवयीन मुलाला पुन्हा बाल न्याय मंडळात हजर करण्यात आलं. दिवसभर चाललेल्या सुनावणीनंतर त्या अल्पवयीन मुलाचं जामीन रद्द करून 5 जूनपर्यंत बाल निरिक्षण गृहात ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.याबाबत त्या अल्पवयीन मुलाचे वकील प्रशांत पाटील म्हणाले की, आज तीन न्यायाधीशांच्या समोर सुनावणी झाली. सरकारी वकीलांनी मांडलं की बाहेर रहाणं या मुलासाठी धोकादायक ठरू शकतं. कारण कल्याणी नगरमधे झालेल्या अपघातानंतर या मुलाबाबत समाजात रोष असल्याने त्याला इजा पोहचू शकते. त्यामुळे या मुलाला 5 जूनपर्यंत बाल निरिक्षण गृहात ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या मुलावर तो सज्ञान म्हणून खटला चालवायचा की नाही हे पोलीस तपासात काय समोर येतं यावर ठरेल. दोन किंवा तीन महिन्यात जेव्हा पोलिसांचा तपास पूर्ण होईल तेव्हा पोलीस न्यायालयासमोर बाजू मांडतील. त्यानंतर न्यायालय या मुलावर सज्ञान म्हणून खटला चालवायचा की नाही हे ठरवेल. हा मुलगा बाल निरिक्षण गृहात असताना पोलीस त्याची चौकशी करु शकतील अशी कायद्यात तरतूद नाही, असं यावेळी प्रशांत पाटील म्हणाले.
दुसरीकडे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल यांना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल अगरवाल यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी कोर्टानं सुनावली. अगरवाल यांच्यासह बार मालक व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांनासुद्धा पुणे सत्र न्यायालयनं २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशाल अगरवाल हे अल्पवयीन तरुणाचे वडील आहेत. १९ तारखेला पुण्यातील कल्याणी नगर भागात अपघात झाला होता. या अपघातात २ जण मृत्युमुखी पडले होते.
रविवारी मध्यरात्री झालेल्या कल्याणीनगर येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध मद्य पिऊन मोटार चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अल्पवयीन मुलावरील गुन्ह्यात वाढ करण्यात आली. अल्पवयीन मुलानं मद्य पिऊन मोटार चालविल्याप्रकरणी पोलिसांनी मोटार वाहन अधिनियममातील कलम १८५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाविरुद्ध पोलिसांनी येरवडा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (भादंवि ३०४), तसेच ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या १८४, ११९ आणि १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता नव्यानं मोटार वाहन अधिनियममातील कलम १८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाला पुन्हा बाल न्याय मंडळात हजर करण्यात येणार आहे. बाल न्याय मंडळाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. रक्त तपासणीसाठी ससून रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे.
अल्पवयीन मुलाला आज सज्ञान ठरविल्यास त्याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात येणार आहे. बाल हक्क न्यायालयात हजर राहण्याकरिता अल्पवयीन मुलाला नोटीस बजाविण्यात आली आहे. त्याच्या पालकानांही आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. अल्पवयीन मुलगा न्यायालयात हजर झाला आहे. दुसरीकडं पुणे महानगरपालिकेनं अनधिकृत पब बुलडोझरनं पाडण्याची कारवाई सुरू केली आहे.
कोण आहे अल्पवयीन मुलाचे वडील?-पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांची जवळपास 600 कोटींची संपत्ती आहे. अनेक लक्झरी हॉटेल्सचे मालक आहेत. त्यांची बांधकाम कंपनी अल्पवयीन मुलाच्या आजोबाांनी सुरू केली होती. त्यांच्या कंपन्या पुण्यातील वडगाव शेरी, खराडी, विमान नगर भागात आहेत. त्यांनी अनेक मोठे गृहप्रकल्पदेखील उभारले आहेत. आरोपीच्या कुटुंबीयांकडे विविध व्यावसायिक कंपन्या आहेत. त्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीनं पुण्यात पंचतारांकित हॉटेल्सही बांधली आहेत. आरोपीच्या व्यवसायामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी भागीदारी केल्याचा आरोप केला जात आहे.
हेही वाचा-
- राहुल गांधींचा पुणे अपघातावरून पंतप्रधान मोदींवर हल्ला, हिट अँड रनमध्ये आजपर्यंत काय घडलंय? - Pune Accident updates
- पुणे हिट अँड रन प्रकरण : पोर्शो कार नोंदणी न करताच रस्त्यावर, 40 लाखांचा टॅक्स नुसता भरणं आहे बाकी - Pune Hit and Run Case