पुणे Pune Metro : पुणे मेट्रोची सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मार्गावर चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ही चाचणी झाली. सिव्हिल कोर्ट स्थानकावरून सकाळी 10:58 वाजता निघालेली मेट्रो 11:59 वाजता स्वारगेट स्थानकावर पोहचली. या दरम्यान मेट्रोचा वेग ताशी 7.5 किमी इतका होता. एकूण 3.64 किमी मार्गावर ही चाचणी घेण्यात आली आहे.
मार्ग मुठा नदी पात्राच्या खालून जातो : या मार्गाची खास बाब म्हणजे, हा मार्ग मुठा नदी पात्राच्या खालून जातो. नदीच्या खालून मेट्रो जाणं ही पुणे शहरासाठी अभिमानाची बाब आहे. सिव्हिल कोर्ट स्थानक 33.1 मीटर खोल तर बुधवार पेठ स्थानक 30 मीटर खोल आहे. मंडई हे स्थानक 26 मीटर खोल आणि स्वारगेट स्थानक 29 मीटर खोल आहे. पुणे मेट्रो प्रकल्पामधील भुयारी मार्गाचं खोदकाम काम 28 सप्टेंबर 2020 ला सुरू करण्यात आलं होतं. 4 जून 2022 पर्यंत एकूण 12 किमी भुयारी मार्गाचं खोदकाम पूर्ण झालं होतं.