पुणे :गेल्या काही वर्षांत बदललेली जीवनशैली आणि वाढत्या आजारांबद्दल आपण चर्चा करत असतो. परंतु विविध संशोधनांतून असं समोर आलं आहे की, पुरुषांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे प्रमाण महिलांपेक्षा जास्त आहे. डी.वाय.पाटील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील काही डॉक्टरांनी पुरुषांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या वाढत्या प्रादुर्भावावर संशोधन केलं. या संशोधनात पुरुषांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे प्रमाण वाढण्याची अनेक कारणं समोर आली.
या कारणांमुळं मधुमेह, उच्च रक्तदाबाचं प्रमाण वाढत :याबाबत डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मधुमेहतज्ज्ञ आणि विभागप्रमुख डॉ. अनु गायकवाड यांनी सांगितलं की, "पुरुषांमध्ये तणावग्रस्त जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळं या आजारांचा धोका वाढतो. इस्ट्रोजेन हा स्त्रियांमध्ये आढळणारा हार्मोन आहे. या हार्मोनमळं हृदय आणि चयापचय आरोग्य सुधारतो. पुरुषांमध्ये या हार्मोनचा अभाव असल्यानं त्यांच्या रक्तदाब आणि साखर नियंत्रणाची क्षमता मर्यादित असते. आणखी एक समस्या म्हणजे चरबी. पुरुषांमध्ये पोटाभोवती साठणारी चरबी इन्शुलिनचा प्रतिकार वाढवते आणि जळजळ व रक्तदाब वाढवणाऱ्या समस्या निर्माण करते. तिसरं कारण म्हणजे, जीवनशैलीतील दोष असून आहारात जास्त कॅलोरी, जंक फूड, सोडियमयुक्त पदार्थांचा समावेश आणि व्यायामाचा अभाव पुरुषांना उच्च रक्तदाब व मधुमेहाच्या कचाट्यात आणतो.चौथी बाब म्हणजे तणाव आणि झोपेची कमतरता. पुरुषांमध्ये कामाचा ताण आणि अपुरी झोप हे मुख्य धोके असून, यामुळं रक्तदाब आणि साखर नियंत्रण असमतोल होत जातो. यामुळं पुरुषांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण हे वाढत जात असल्याचं समोर आलं."