पुणे Ladki Bahin Yojana:राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 25 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जुलैपासून या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवनात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. या बैठकीला उच्च, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार शरद पवार यांच्यासह आमदार, अधिकारी उपस्थित होते.
लाडकी बहीण योजना : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यात 4 लाख 29 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज सादर केले, त्यांना जुलैपासून लाभ देण्यात येणार आहे. या योजनेसाठी दरमहा सुमारे 3 हजार 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळं प्रत्येक पात्र महिलेला योजनेचा लाभ मिळू शकेल. या योजनेचा लाभ घेऊ शकणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांना शहरी, ग्रामीण भागात अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
27 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचं आयोजन : "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यात 27 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल, त्यामुळं भविष्यात चांगला रोजगार मिळू शकेल. अनेक उद्योगांनी या योजनेला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असून प्रशिक्षणार्थींनी चांगली कामगिरी केल्यास कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल. ही योजना तरुणांसाठी रोजगाराची चांगली संधी आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे".