पुणे Manorama Khedkar Company Sealed : तळवडे येथील खेडकर कुटुंबाशी संबंधित असलेली आणि महापालिकेचा कर थकवल्याबद्दल वादग्रस्त कंपनी थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडला महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाच्या वतीनं शुक्रवारी टाळं ठाेकण्यात आलंय. दरम्यान, या कंपनी संचालकाकडं महानगरपालिकेची दोन लाख 77 हजार रुपयांची कराची थकबाकी असल्यानं ही कारवाई करण्यात आलीय.
पूजा खेडकर यांनी दिला होता या कंपनीचा पत्ता :वादग्रस्त परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र काढलं, त्यावेळी या कंपनाीचा पत्ता आपला रहिवासाचं ठिकाण म्हणून दिला. त्यामुळे पिंपरी चिंचवड इथली थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी प्रकाशझोतात आली. याबाबत माध्यमातून बातम्या प्रसारित होताच, महापालिकेनं या कंपनीवर कर थकवल्याबद्दल कारवाईचा बडगा उगारला.
मनोरमा दिलीप खेडकर यांच्या नावानं आहे कंपनी :तळवडे गावठाण, ज्याेतिबानगर इथं थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. ही कंपनी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी निगडीत आहे. त्यामुळं कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकलीय. सदरील कंपनी मनोरमा दिलीप खेडकर यांच्या नावे असून महापालिकेनं यासंदर्भातील सर्व कागदपत्रं तपासली आहेत.