मुंबई- महाराष्ट्रात विकासकामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काँग्रेसच्या सरचिटणी प्रियंका-गांधी वड्रा यांनी केला. त्यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत रत्नागिरी रेल्वे स्टेशनचे छत कोसळल्याचा दावा केला. मात्र, ही माहिती चुकीची असल्याचं कोकण रेल्वेकडून सांगण्यात आलं.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वड्रा सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी एक्स सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, "महाराष्ट्र सरकार म्हणजे 'धोके आणि खोके' सरकार आहे. या सरकारनं विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून प्रचंड भ्रष्टाचार केला. महाराष्ट्रातील जनता याचा लवकरच हिशोब करणार आहे. मुंबई-नाशिक महामार्गाचं काम सुरू असताना त्यात 500 हून अधिक खड्डे पडले आहेत.यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गामधील पुतळा उद्घाटनानंतर काही महिन्यांतच कोसळला होता. मुंबईत 18 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला खड्डे पडले आहेत."
छत हे पार्किंगचे असून रेल्वे स्थानकाचे नाही-रत्नागिरीत दिवसभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसान झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हाच व्हिडिओ केरळ काँग्रेसकडून शेअर करण्यात आला. खराब झालेले छत हे पार्किंगचे असून रेल्वे स्थानकाचे नाही, असा दावा कोकण रेल्वेसह पीआयबी फॅक्ट चेकनं केला. त्यांनी याबाबत एक्स हँडलवरून पोस्ट केली. कोकण रेल्वेचे प्रवक्ते म्हणाले, "व्हिडिओमध्ये रत्नागिरी स्थानकाबाहेरील पार्किंग क्षेत्र दाखवण्यात आलं आहे. या पार्किंगचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केलं जात आहे. त्याचा रेल्वेच्या कामकाजावर कोणताही परिणाम होत नाही. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रेल्वे स्टेशन इमारतीपासून 150-200 मीटर अंतरावर रत्नागिरी स्टेशन कॉम्प्लेक्समध्ये उद्यान, सभागृह आणि पार्किंग क्षेत्र विकसित करण्यात येत आहे. कृपया चुकीची माहिती पसरविणं टाळा,” असे प्रवक्त्यानं म्हटलं.
नेमकी वस्तुस्थिती काय आहे?
- सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेच्या एक्स मीडिया हँडलवरून स्टेशन प्लॅटफॉर्मचा नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला. यामध्ये रेल्वे स्टेशनच्या छताचे कुठेही नुकसान झाल्याचं दिसून येत नाही.
- रविवारी संध्याकाळी रत्नागिरीत मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यामुळे रेल्वेच्या पार्किंग क्षेत्रामधील टिन पत्रे उडून गेले. त्यावेळी क्लॅडिंग पडले. त्यामुळे छताचे सुमारे 15 ते 20 चौरस फूट नुकसान झाले. राज्यातील सुमारे 36 रेल्वे स्थानकांचे दर्शनी भाग आणि प्रवेशद्वारांच्या सुशोभिकरणासाठी राज्य विभागानं कोकण रेल्वेसोबत सामंजस्य करार केला आहे.