मुंबई Narendra Modi visit to Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर येतेय. मोदी जानेवारी महिन्यात 3 वेळा महाराष्ट्र दौऱ्यावर होते. आता फेब्रुवारीमध्ये देखील मोदी 3 वेळा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळं मोदींचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम आहे का? त्यांना महाराष्ट्रात सतत का यावं लागत आहे? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सतत महाराष्ट्रात येत असून, महायुतीतील तिन्ही पक्षातील नेत्यांवर त्यांच्या विश्वास नसल्यानं मोदींना महाराष्ट्र दौरा करावा लागत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मोदींच्या दौऱ्यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
फेब्रुवारी महिन्यात मोदींचा कसा असणार दौरा :19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे दौऱ्यात मोदींच्या हस्ते पुणे एअरपोर्ट टर्मिनल, पुणे मेट्रोच्या मार्गिकेचं उद्घाटन होणार आहे. यानंतर पंतप्रधान मोदी शिवनेरी किल्ल्यावरही जाण्याची शक्यता आहे. कारण याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता. त्यादिवशी मोदी शिवनेरी किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळी नतमस्तक होणार असल्याची माहिती मिळतेय. तसंच मोदी 11 फेब्रुवारी रोजी यवतमाळमध्ये महिला बचत गटाच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मोदी नागपुरात भाजपाच्या एससी सेलच्या देशभरातील 25 हजार पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती पुढं येत आहे. त्यामुळं मोदी एकूण 3 वेळा महाराष्ट्रात येणार आहेत.
विकासकामांसाठी येत असतील तर गैर काय :पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार विकासात्मक कामांसाठी महाराष्ट्रात येत असतील तर, त्यात गैर काय? महाराष्ट्रावर त्यांचं विशेष प्रेम आहे, म्हणून ते राज्यात येत आहेत. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात काँग्रेसच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्राला किती प्राधान्य दिलं होतं? असा सवाल शिवसेना (शिंदे गटाचे) प्रवक्ते अरुण सावंत यांनी उपस्थित केला आहे. सध्या विरोधकांकडं कोणताच मुद्दा नसल्यानं त्यांनी मोदी महाराष्ट्रात येत असल्यावरून टीका केलीय. त्यामुळं विरोधकांनी अशी टीका करणं अत्यंत चुकीचं असल्याचं सावंत यांनी म्हटंलय. तिन्ही पक्षातील नेत्यावर मोदींचा विश्वास नाही का? त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावं लागतं का? असा प्रश्न सावंत यांना विचारला होता. त्यावर ते म्हणाले की, असं बिल्कुल नाही तिन्ही पक्षांच्या नेत्यावर मोदींचा विश्वास आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन उपमुख्यमंत्री राज्याला विकासाकडं नेण्याचं कार्य करत आहेत. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांचं सहकार्य मिळत आहे. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. तसंच पंतप्रधान मोदी राज्यात येऊन काही विकास निधी देत असतील, तर त्यात गैर काय आहे? असं अरुण सावंत यांनी म्हटलं आहे.