महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केसाने गळा कापू नका; रामदास कदम यांचा भाजपाला इशारा, म्हणाले विश्वासघात केला तर खैर नाही - Ramdas Kadam on Lok sabha seat

Ramdas Kadam : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अमित शाह यांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही सोबत आलो आहेत. मात्र, आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे असं मत शिवसेना नेते रामदास कदम यांनी मांडलं आहे. ते खेडमध्ये बोलत होते.

शिवसेना नेते रामदास कदम
शिवसेना नेते रामदास कदम

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 10:42 PM IST

व्हिडिओ

रत्नागिरी : Ramdas Kadam : शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या ज्या सध्याच्या जागा आहेत त्या जागांसाठी भाजपा प्रयत्न करत आहे. यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड, मावळ, संभाजीनगर या जागांवर भाजपाकडून जे सुरू आहे ते अतिशय घृणास्पद आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया रामदास कदम यांनी आज दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील काही भाजपा नेत्यांचे कान उपटले पाहिजेत असंही कदम यावेळी म्हणाले आहेत. तसंच, तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोक आले आहेत, त्यांचा केसाने गळा कापू नका, एक वेगळा मॅसेज जातोय याचं भान भाजपाच्या काही लोकांना असणं आवश्यक आहे असं देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

'स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून उद्घाटनं' : खेड दापोली विधानसभा मतदारसंघात भाजपाने युती असतानाही (2019) मध्ये उघडपणे माझ्या मुलाच्या विरोधात काम केलं. (2009)मध्ये युती असतानाही मला गुहागरमध्ये भाजपानेच पाडलं, हे वास्तव आहे असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी यावेळी केला आहे. तसंच, आता माझ्या मुलाच्या मतदारसंघात पुन्हा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि त्यांचे भाजपाचे कार्यकर्ते उद्घाटनं, भूमिपूजनं हे सगळं स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून करत आहेत. हे असं असेल तर भविष्यात भाजपावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, याची दखल वरिष्ठ पातळीवर भाजपच्या मंडळीनी घेतली पाहिजे अशी अपेक्षाही रामदास कदम यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

'ज्या जागा आम्ही लढलोय त्यावर आमचा अधिकार' : मागच्या निवडणुकीत काय झालं मला माहीत नाही, पण पुन्हा-पुन्हा आमचा विश्वासघात झाला, तर माझंही नाव रामदास कदम आहे हे मी आज सांगतोय असा इशारा रामदास कदम यांनी दिला. तसंच, ज्यावेळी लोकसभेची तिकीटं जाहीर होतील त्यावेळी मी माझं वैयक्तिक मत काय ते पुन्हा मांडेन असं देखील रामदास कदम यावेळी म्हणाले आहेत. जागेची मागणी कोणीही करू शकतो, पण मतदारसंघात कोणाचं वर्चस्व आहे ते पाहिलं पाहिजे. आमचे 40 आमदार, 10 अपक्ष आमदार आणि 13 खासदार आहेत. राष्ट्रवादीचे किती आले हे भुजबळांनी सांगावं असा टोला रामदास कदम यांनी छगन भुजबळ यांना लगावला आहे. 22 जागा आम्ही लढल्या होत्या, ज्या जागा आम्ही लढलोय त्यावर आमचा अधिकार निश्चितच आहे असं देखील रामदास कदम यावेळी म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक : भाजपाच्या सर्व्हेबद्दल मला कल्पना नाही. पण ते 36 नाही 48 पण जागा मागू शकतात. सगळ्या ठिकाणी कमळच घेऊन जायचं आणि इतर सगळ्यांना नेस्तनाबूत करायचं, असं चाललं आहे की काय? अशी मला शंका येतेय असंही ते म्हणालेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यामध्ये दखल घेतील आणि असं होऊ देणार नाहीत असा मला विश्वास असल्याचं देखील रामदास कदम यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुकही केलं.

ABOUT THE AUTHOR

...view details