नागपूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी फोनवर शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांनी धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप इंद्रजीत सावंत यांनी समाज माध्यमांवर वायरल केलेली आहे. त्यानंतर आता प्रशांत कोरटकर यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, "इंद्रजीत सावंत यांना मी ओळखत देखील नाही. त्यामुळे धमकी देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मला अनेक फोन येत आहेत. तो आवाज माझा नाही, मी त्यांना कॉल केला नाही आणि त्यांचा नंबरही माझ्याकडं नाही."
प्रशांत कोरटकर (Reporter) प्रकरणाला देण्यात येत आहे जातीचा रंग :"छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीनं इतिहास संशोधकासारख्या मोठ्या व्यक्तींवर बोलण्याचा विषयच येत नाही. मी त्यांची पोस्ट वाचली नाही. मात्र, मला सकाळपासून जे फोन येत आहेत, त्यावरून असं दिसतंय की याला जातीचा रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय," असंही कोरटकर यांनी यावेळी सांगितलं.
'मी इंद्रजीत सावंतांना ओळखत नाही, त्यामुळे धमकीचा प्रश्नच नाही' : प्रशांत कोरटकर यांची स्पष्टोक्ती (Reporter) सकाळपासून शेकडो धमकीचे फोन आले :"मी नागपूरचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे सायबर प्रमुख यांना अर्ज करून हा खोडसाळपणा ज्यांनी केला आहे, त्याचा शोध घेण्याची विनंती करणार आहे. इंद्रजीत सावंत यांच्यासारख्या व्यक्तीनंही शहानिशा न करता, माझ्याशी चर्चा किंवा फोन न करता थेट समाज माध्यमावर पोस्ट केली. त्यामुळे मला सकाळपासून शेकडो धमकीचे फोन आले आहेत. या प्रकरणाची चौकशी झालीचं पाहिजे, अशी मागणी करणार आहे," असं प्रशांत कोरटकर म्हणाले.
प्रशांत कोरटकर (Reporter) तर इंद्रजीत सावंत जबाबदार राहतील : "मी सामाजिक जीवनात कधीही कोणत्याही जातीचा उल्लेख केला नाही. मी मुख्यमंत्र्यांचं नाव वापरलं, असा कुठंही उल्लेख नाही. यामुळे मला जो काही मनस्ताप होत आहे, यात काही चुकीचं घडलं, तर याला पूर्णतः इंद्रजीत सावंत जबाबदार राहतील," असंही कोरटकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
- इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकी : माथेफिरुनं मुख्यमंत्र्यांच्या जातीचाही केला उल्लेख
- छावा चित्रपट प्रदर्शनाआधी वादाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता!, संभाजी राजेंनी केली दिग्दर्शकांना 'ही' विनंती