अकोला : महाविकास आघाडीच्या निमंत्रणानंतर आम्ही बैठकीला गेलो होतो. या बैठकीत नेमके मुद्दे मांडण्याचा वंचित बहुजन आघाडीनं प्रयत्न केला आहे. या बैठकीत सुरुवातीला ओबीसी संवर्गातील आरक्षणात कोणीही वाटेकरी होऊ नये, यावर आम्ही चर्चा केली. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना संदर्भात चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या बैठकीत तिन्ही पक्षांनी जागेच्या वाटपाबाबत माहिती द्यावी, त्यानंतर वंचित बहुजन आघाडी निर्णय घेईल, असं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
बैठकीत आमच्याकडून 25 मुद्दे :पुढं बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बैठकीत काहीही ठरलं नसल्याचं दिसून येत आहे. त्यांनी काहीतरी ठरवावं म्हणून काही मुद्दे आमच्याकडून मांडलं गेले. या बैठकीत आमच्याकडून 25 मुद्दे देण्यात आले आहेत. आम्ही प्रत्येक पक्षाला त्या मुद्द्यावर त्यांची भूमिका मांडण्याचं आवाहन केलं आहे. या मुद्यावर त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे. याबाबत आम्ही त्यांना भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलंय.