मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला 230 जागा मिळाल्या असून, बहुमताचा आकडा 145 असताना महायुतीला यापेक्षा 85 जागा अधिक मिळाल्यात. आता निकालाला 10 दिवस होत आले तरीही राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अजूनही अस्पष्टता आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाचा नेता अद्याप ठरवला जात नाही. आता भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केलीय. 4 डिसेंबरला भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक होत असून, या बैठकीत या दोघांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार जरी घेतली असली तरी त्यांच्या काही मागण्यांनी नव्या सरकारच्या शपथविधीत खो घातलाय. याच कारणाने भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक दोनदा पुढे ढकलण्यात आलीय. या दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता होईल, याची माहिती दिलीय. परंतु मुख्यमंत्री कोण? यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. अशा परिस्थितीत अखेर भाजपाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून नेमणूक केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी 4 डिसेंबरला भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक होत असून, या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा हे निरीक्षक करणार आहेत.
अमित शाह यांची भेट घेणार : यापूर्वी भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी 29 नोव्हेंबर, 1 डिसेंबर, 3 डिसेंबर अशा तारखा देण्यात आल्या होत्या. 5 डिसेंबरला शपथविधी असल्याकारणाने अखेर भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी 4 डिसेंबर ही तारीख जवळपास नक्की करण्यात आलीय. त्यातच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्ली दौरा करणार असून, या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे संभाव्य मंत्र्यांची यादी त्यांच्या रिपोर्ट कार्डसह देणार आहेत. यापूर्वी मागील महिन्यात 28 नोव्हेंबरला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती.
हेही वाचा :