ठाणे : राज्यातील मुख्यमंत्रिपदावरून सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी मंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं म्हटलंय. मी उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याच्या बातम्या निराधार आहेत. किंबहुना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असून, मुख्यमंत्रिपदावर दावा करीत आहे. त्याचवेळी भाजपासोबतच्या महायुतीत सहभागी असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
...मुख्यमंत्रिपदाचा चेहरा भाजपाचा असेल : विशेष म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत आणि मुख्यमंत्री चेहरा भाजपाचा असेल, तर शिवसेनेकडून त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील, अशी शक्यता वर्तवली जातेय. मात्र, आता खासदार श्रीकांत शिंदे यांनीच त्यावर प्रतिक्रिया दिलीय. आज श्रीकांत शिंदे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, आपणाला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मिळत असतानादेखील पक्षाच्या सहकाऱ्यांना हे पद मी दिलेलं आहे. त्यामुळे मला सत्तेचा मोह नाही. शपथविधी थोडा लांबल्यामुळे अफवा पसरू लागलेल्या आहेत, असंही श्रीकांत शिंदे म्हणालेत.
महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे…
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) December 2, 2024
राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतलीय. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आलाय. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्रिपदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे. माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देताना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा, असंही एक्सवर श्रीकांत शिंदे म्हणालेत.
हेही वाचा :