मुंबई Prakash Ambedkar On Ujjwal Nikam : 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यात (Mumbai Terror Attack) हेमंत करकरे तसंच विजय साळसकर यांना वीरमरण आलं होतं. मात्र, हेमंत करकरे तसंच विजय साळसकर यांना लागलेल्या गोळ्या या दहशतवादी कसाबकडं असलेल्या गोळ्यांशी मिळत नसल्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता. तसंच दहशतवादी अबू इस्माईलच्या बंदुकीतूनही या गोळ्या मारल्या गेल्या नाहीत. मात्र, अन्य कुणाच्यातरी बंदुकीतून या गोळ्या झाडण्याता आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मात्र, या गोळ्या कोणी झाडल्या याबाबत न्यायालयाला ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अवगत केलं नाही. तसंच या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी न्यायालयात निकम यांनी का मागणी केली नाही?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
उज्ज्वल निकम सत्य लपवत आहेत :उज्ज्वल निकम यांनी यासंदर्भात सत्य का लपवलं? न्यायालयाला त्यांनी ही बाब का निदर्शनास आणून दिली नाही? यामागील नेमकी कारणं काय आहेत? या प्रश्नांची उत्तरं निकम यांनी द्यावी. आता ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं त्यांना प्रश्न विचारण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली. त्यांनी जाहीरपणे आमच्या प्रश्नाची उत्तरं द्यावीत, असंही आंबेडकर म्हणाले.