मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या आदर्श आचारसंहिता लागू आहे. अशातच काही गोष्टींवर निर्बंध येतात. त्यातील महत्त्वाचा नियम म्हणजे रोख रक्कम बाळगण्याबाबतचा आहे. निवडणुकीच्या काळात मते मिळविण्यासाठी मतदारांना रोख रक्कम दिली जात असल्याचा विरोधकांकडून आरोप होत आहे. या बाबींना आळा घालण्यासाठी आयकर विभाग, मुंबई पोलीस आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी हे गस्त घालत असतात. तसेच छापेमारी करत असतात. अशाच एका छापेमारीत मुंबईतील भुलेश्वर येथे आयकर विभागाला करोडो रुपयांची रोख रक्कम हाती लागली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? : या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ तसंच रोख रकमेची तस्करी होऊ नये, यासाठी रात्रीची गस्त, नाकाबंदी वाढवण्यात आली आहे. याच नाकाबंदी दरम्यान पोलिसांना पाच जण मोठ्या बॅगा घेऊन जाताना आढळले. पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी या पाचही जणांची तपासणी केली. या तपासणी वेळी पोलिसांना त्यांच्या बॅगेमध्ये एक कोटी 32 लाख रुपयांची रोकड असल्याचं निदर्शनास आलं. या रोख रकमेसह पोलिसांनी या पाचही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. याबाबतची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती आयकर विभाग आणि पोलिसांनी दिली आहे.