ठाणेFake Butter Selling Business: ठाणे जिल्ह्यातील काटई बदलापूर रोडवरील खोणी गावानजिक मानवी सेवनास हानिकारक असलेले अमूल बटरच्या नावाने बनावट बटर बनविण्याच्या कारखान्यावर कल्याण गुन्हे शाखेच्या पथकानं काल (5 मार्च) धाड टाकून भंडाफोड केला. खळबळजनक बाब म्हणजे, बनावट अमूल बटर हे जिल्ह्यातील हॉटेल्स, सॅन्डविच हातगाडी चालक तसेच ढाबे व्यावसायिकांना अस्सल अमूल बटर म्हणून विकले जायचे.
दोघांना अटक :याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून बनावट बटर तयार करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. पिंटु झीनक यादव (वय ३६) आणि प्रेमचंद फेकुराम (वय ३२ दोघेही रा. खोणीगाव, बदलापुर काटई रोड, डोंबिवली पूर्व) अशी आरोपींची नावे आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे धाड :पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हवालदार दत्ताराम भोसले आणि गुरूनाथ जरग यांना ५ मार्च रोजी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार काही इसम हे डोंबिवली पूर्व भागातील एका कारखान्यात बनावटी बटर बनवित आहेत. बातमीच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या मदतीने काल मंगळवारी अचानक धाड टाकली. या दरम्यान मानवी सेवनास हानिकारक असलेले अमूल कंपनीचे बनावट बटर बनवित असताना आरोपी पिंटु यादव आणि प्रेमचंद फेकुराम यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला गेला.