पिंपरी चिंचवड (पुणे)Drug Smuggling Case:पिंपरी चिंचवडच्या पिंपळे निलख परिसरात 2 कोटींचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स विक्रीच्या प्रयत्नातील युवकाला काल (1 मार्च) अटक केली होती. पोलिसांना या प्रकरणात आरोपीच्या संपर्कातील पोलीस फौजदाराचा थेट सहभाग असल्याचा संशय होता. अखेर निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या फौजदार विकास शेळके याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे, फौजदार शेळके याच्याकडून ४५ कोटी रुपये किमतीचे ४४.५० किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले.
आरोपीला पहाटे ड्रग्जसह अटक :याप्रकरणी नमामी शंकर झा (३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) याला सुरुवातीला अटक करण्यात आली होती. पोलीस अंमलदार विजय मोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (१ मार्च) पहाटे साडेचारच्या सुमारास पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांकडून सुरुवातीला कारवाई करण्यात आली होती. तेव्हा नमामी शंकर झा याला अटक करून त्याच्याकडून २ कोटी रुपये किमतीचे २ किलो ३८ ग्रॅम वजनाचे एमडी जप्त करण्यात आले होते. आरोपीकडे जे ड्रग्स आढळून आले, त्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस दलातील निगडी पोलीस ठाण्याचा अधिकारी विकास शेळके याचाही सहभाग असल्याचं उघड झालं आहे.
पोलीस दलात खळबळ :संबंधित ड्रग्ज प्रकरणात पोलिसांचा थेट सहभाग असल्याचं उघड झाल्यानं एकच गोंधळ उडाला. अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कसून केलेल्या चौकशी नंतर फौजदार शेळके याला मध्यरात्री अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडून ४४.५० किलो एमडी जप्त करण्यात आलं आहे. विकास शेळके याच्या मालकीचे पिंपरी चिंचवड शहरात दोन ते तीन हॉटेल्स असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरू आहे. शेळके यानं यापूर्वी ड्रग्ज तस्करी केली आहे का? या प्रकरणात आणखी कोणते अधिकारी सहभागी आहेत का याचा शोध सुरू आहे.
पोलीस दलाची मान शरमेने खाली :या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड पोलीस दलाची मान खाली गेली आहे. कारण 15 दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील दोन कर्मचारी खंडणी उकळल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले होते. तर दोन अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याची लाच प्रकणात बदली करण्यात आली आहे.
हेही वाचा:
- 'दादां'ना पीएमसी देईन, मात्र गृहखातं देणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी घेतली अजित पवारांची फिरकी
- अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण; बलात्कारी गुंडासह त्याच्या साथीदारांना वीस वर्षाचा सश्रम कारावास
- रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा वाद : 'भाजपाला सगळे पक्ष संपवायचे', शिंदे गटाच्या 'या' नेत्याचा भाजपावर हल्लाबोल