मुंबईGuru Siddappa Ambadas Waghmare :वरळी येथील डॉ. ई मोजेस रोडवर असलेल्या सॉफ्ट टच नावाच्या स्पामध्ये मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास गुरुसिद्धप्पा अंबादास वाघमारे (वय ५०) याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी सॉफ्ट टच स्पाचा पार्टनर संतोष शेरेकर (वय ५०) याला काल वरळी पोलिसांनी चौकशी दरम्यान ताब्यात घेऊन अटक केली. आज या आरोपीला शिवडी कोर्टात हजर केले असता शिवडी कोर्टाने शेरेकर याला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नालासोपारा येथील मोहम्मद फिरोज अन्सारी (वय २८) याला ताब्यात घेतले असून साकिब अन्सारी या आरोपीला दिल्लीला जाणाऱ्या निजामुद्दीन एक्सप्रेस (गरीबरथ) मधून रेल्वे पोलिसांच्या मदतीनं पडकलं आहे.
२२ नावे टॅटू स्वरूपात कोरली :गुरुसिद्धप्पा वाघमारे हत्या प्रकरणी आणखी दोन संशयितांना राजस्थानमधील कोटा येथून ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे; मात्र या घटनेत पोलिसांना मिळालेल्या विशेष माहितीत मृत वाघमारे याच्या पायाच्या दोन्ही मांड्यांवर २२ नावे टॅटू स्वरूपात कोरलेली आढळून आली आहेत.
'त्या' डायरीत महत्त्वाचे धागेदोरे :वाघमारे याने दोन्ही पायांवर कोरलेली २२ नावे त्याच्या शत्रूंची होती. त्याचं काही बरं वाईट झाल्यास त्या नावांपैकी व्यक्तीस जबाबदार धरावं, असं लिहिलेलं होतं. तसेच महत्त्वाचं म्हणजे या टॅटू स्वरूपात कोरलेल्या नावात सॉफ्ट टच स्पाचा पार्टनर संतोष शेरेकर याचं देखील नाव कोरलं असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. तसेच वाघमारे याच्या घरी सापडलेल्या लाल रंगाच्या डायरीत अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.