मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नौदलाच्या तीन युद्ध नौकांचं लोकार्पण करणार आहेत. या लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान नवी मुंबईतील खारघर येथील इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना म्हणजेच इस्कॉनच्या मंदिराचं उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं नवी मुंबईत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी काही मार्गांवर वाहतुकीत बदल केले आहेत.
वाहतुकीत बदल (Mumbai police) रस्ते वाहनांसाठी बंद :खारघरच्या सेक्टर 23 मध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती सहभागी होणार आहेत. त्यामुळं या विभागात वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याचं नवी मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. नवी मुंबई पोलीस वाहतूक शाखेनं लोकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. आज खारघरमधील काही रस्ते वाहनांसाठी बंद राहणार असून काही भागात 'नो पार्किंग' झोन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक विभागानं केलंय.
या मार्गावर वाहतूक बंद : नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खारघर सेक्टर 23 या भागात कार्यक्रम स्थळाजवळील रस्त्यांवर आज व्हीव्हीआयपी वाहनं, पोलीस आणि आपत्कालीन सेवा वाहनांना परवानगी असेल. या भागांमध्ये ओवे गाव पोलीस चौकी ते जे कुमार सर्कल, गुरुद्वारा चौक ते जे कुमार सर्कल, बीडी सोमाणी शाळेपर्यंतचा भाग आणि इस्कॉन मंदिराच्या गेट क्रमांक 1 आणि गेट क्रमांक 2 मधील रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांवर वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, यात अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका या आपत्कालीन सेवांशी संबंधित वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आल्याचं नवी मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.
हे आहेत पर्यायी मार्ग : नवी मुंबई पोलिसांनी पर्यायी वाहतूक मार्ग देखील उपलब्ध करून दिला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशांत कॉर्नर ते ओवे गाव पोलीस स्टेशन आणि ओवे गाव चौकातून जे कुमार सर्कलकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रशांत कॉर्नरजवळ उजवं वळण घेऊन तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी पोहोचता येईल. शिल्प चौकातून जे कुमार सर्कल किंवा ओवे गाव पोलीस स्टेशनकडे जाणारे नागरिक ग्रीन हेरिटेज चौकातून उजवीकडे किंवा डावीकडे वळू शकतात. ग्रामविकास भवनाकडून ग्रीन हेरिटेज चौकातून येणारे लोक डावीकडं वळून जे कुमार सर्कल किंवा बीडी सोमाणी शाळेमार्गे ओवे गाव पोलीस स्टेशनकडे जाऊ शकतात. सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशनपासून जे कुमार सर्कल किंवा ओवे गाव पोलीस स्टेशनकडे जाणारे लोक ग्रामविकास भवनपासून उजवीकडे वळू शकतात.
हे वाचलंत का :
- पंतप्रधान मोदी मुंबई डॉकयार्डवर दाखल ;थोड्याच वेळात युद्धनौकांसह पाणबुडीचं करणार लोकार्पण
- दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अरविंद केजरीवाल अडचणीत, नामांकन दाखल करण्यापूर्वीच मोठी घडामोड
- मोठी बातमी! वाल्मिक एसआयटीकडून कराडवर मकोकाचा प्रस्ताव, कोर्टात काय घडलं?